कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून धडाडणार्या तोफा मंगळवारी (दि. 13) सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहेत. महापालिकेसाठी जाहीर प्रचाराची सांगता होताच, छुप्या प्रचाराला वेग येणार आहे. मता-मतांसाठी जोडण्या सुरू झाल्या असून, त्याकरिता गुप्त बैठकांबरोबरच साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर सुरू झाला आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या 20 प्रभागांतून 81 जागांसाठी 327 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गुरुवारी (दि. 15) मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी गेल्या महिन्याभरापासून उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधली होती. उमेदवारी अंतिम झाल्यानंतर चिन्हवाटप झाले आणि त्यांच्या प्रचाराला वेग आला. गेल्या आठ दिवसांत तर उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी प्रभागाचा कोपरान्कोपरा पिंजून काढला. आरोप-प्रत्यारोप करत, प्रभागाच्या विकासासाठी विविध कामांची आश्वासने देत, घराघरांपर्यंत जाऊन मतदारांशी संवाद साधत उमेदवार विजयी करण्याचे आवाहन करत होते. अखेरच्या काही दिवसांत तर उमेदवार, कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धुरळाच पाडला होता.
काहीही झाले तरी विजय आपलाच, या भावनेने उमेदवारांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. कोपरा सभा, जाहीर सभा, रॅली, भागाभागांत मतदारांपर्यंत थेट संपर्कासाठी प्रचाराची यंत्रणा राबवत गेल्या काही दिवसांत शहराच्या प्रभागा-प्रभागांतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. गेल्या काही दिवसांपासून तापलेले हे राजकीय वातावरण मंगळवारी सायंकाळी साडेपाचनंतर शांत होणार आहे. मात्र, सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर छुप्या प्रचाराला वेग येणार आहे.
जाहीर प्रचाराच्या सांगतेनंतर मतदानापर्यंत मिळणार्या 48 तासांत जोडण्या लावण्यासाठी यंत्रणाही सज्ज ठेवली जात आहे. गठ्ठा मतदान, बाहेरगावी असणारे मतदार आदींसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जात आहे. उद्या जाहीर प्रचार संपल्यानंतर घराघरांत थेट प्रचार सुरू होईल. मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी, तसेच गुप्त बैठका आणि रात्रीच्या जोडण्यांना वेग येणार आहे. दरम्यान, सोमवारी रात्रीपासूनच ठिकठिकाणी साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब सुरू झाला आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांची फौजही कामाला लागली आहे. मतदारांच्या याद्या तयार केल्या जात आहेत, त्यानुसार घराघरांत जाऊन त्यांची भेट घेतली जात आहे.
यंदा तुम्हालाच मत...
महापालिकेसाठी गुरुवारी मतदान होत आहे, यामुळे अखेरपर्यंत उमेदवार मतदारांना मतदानासाठी विनंती करत आहेत. विविध विकासाचे मुद्दे सांगत, मॉर्निंग वॉकपासून ते रात्री उशिरापर्यंत घरोघरी फिरून विजयानंतर काय करणार, याचा पाढाच उमेदवार वाचत आहेत. त्यावर मतदारसुद्धा यंदा तुम्हालाच मत, असे म्हणत उमेदवारांच्या उत्साहात भर घालत आहेत.