कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाच्या जोर बैठका सुरू आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. शुक्रवारी दुपारी भाजप नेते उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापुरात येत आहेत, त्यामुळे भाजपच्या हालचाली गतिमान होणार आहेत.
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि महायुती आपली ताकद आजमावणार आहेत. त्यामुळे आघाडी आणि युती अधिकाधिक तगडे उमेदवार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक घटक पक्षाच्या मुलाखती सुरू असून, अद्याप कोणत्याही पक्षांनी आपले पत्ते उघड केलेले नाहीत. भाजपकडे 300 हून अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत. मुलाखतींचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. उमेदवार निवडीवर अंतिम शिक्कामोर्तब मंत्री चंद्रकांत पाटील आणि खा. धनंजय महाडिक व आ. अमल महाडिक करणार आहेत.
खा. महाडिक संसद अधिवेशनासाठी दिल्लीत, तर मंत्री चंद्रकांत पाटील मुंबईला गेले आहेत. पाटील शुक्रवारी दुपारी कोल्हापुरात, तर महाडिक शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी सकाळी कोल्हापुरात दाखल होत आहेत. दोन्ही नेते कोल्हापुरात येत असल्याने इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. मंत्री पाटील शुक्रवारी कोल्हापुरात येताच भाजप गोटातील हालचाली गतिमान होणार आहेत. मंत्री पाटील विविध घटकांशी संवाद साधणार असून, महायुतीतील काही नेत्यांशीही ते चर्चा करण्याची शक्यता आहे. मंत्री पाटील शुक्रवारपासून गाठीभेटी घेणार असल्याने इच्छुकांनी आपल्या गळ्यात उमेदवारीची माळ पडावी, यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करीत आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन
भाजपने इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी उमेदवारी अर्ज कसा भरावा, उमेदवारी अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी, कोणत्या कागदपत्रांच्या आधारे उमेदवारी दाखल करू शकतो, याबाबत मार्गदर्शन देण्यात आले. तसेच, भाजपच्या सोशल मीडिया विभागातर्फे इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी कसा करावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.