सतीश सरीकर
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणूक होण्यापूर्वीच महायुतीतील घटक पक्षांमध्ये मोठा भाऊ कोण? हा प्रश्न उभा राहिला आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे निवडणुकीत महायुती म्हणूनच रणांगणात उतरणार आहेत. मात्र, राजकारणात एकमेकांविरुद्ध वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तेच पक्ष आमने-सामने येत असल्याचे चित्र आहे. तिन्ही पक्षांना महापौर आपल्याच पक्षाचा करायचा असल्याने वर्चस्वासाठी लढाई सुरू झाली आहे. वरकरणी ते एकत्र असले, तरी प्रत्यक्षात महापौरपदाच्या गडावर कोणाची सत्ता असावी, यावरूनच स्पर्धा रंगली आहे.
कोल्हापुरातही जातीय समीकरणे, स्थानिक नेत्यांचा प्रभाव, कार्यकर्त्यांची चळवळ या सगळ्यांचा निवडणूक निकालावर थेट परिणाम होतो. महापालिका निवडणुकीत फक्त पक्षाचे नाव पुरेसे नसते, तर स्थानिक उमेदवाराची प्रतिमा व प्रभागातील संघटनशक्तीही महत्त्वाची ठरते. त्यामुळे महायुतीतील कोणताही पक्ष स्वतःला ‘मोठा भाऊ’ म्हणत असला, तरी अंतिम निकालात मतदारांचा निर्णयच खरा ठरणार आहे.
भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते स्वतंत्र दावे करून कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करीत आहेत. पण याच स्पर्धेमुळे महायुतीत फूट पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. विरोधकांना याचा थेट फायदा होऊ शकतो. महापालिकेत सत्ता कोण मिळवते? हे अद्याप अनिश्चित आहे. मात्र एवढे स्पष्ट आहे की, महापौरपदासाठीची लढत ही महायुतीतल्या मोठ्या भावाच्या प्रश्नाभोवतीच फिरणार आहे.