कोल्हापूर : जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींसाठी बुधवारी चिन्ह वाटप झाले. चिन्ह मिळताच उमेदवारांच्या प्रचाराचा वेग वाढला. उर्वरित चार दिवसांत सर्व मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचवावे लागणार आहे. दरम्यान, चिन्ह वाटपावरून हुपरी नगरपरिषदेत गोंधळ झाला. यामुळे पोलिस बळाचा वापर करावा लागला.
नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी बुधवारी सकाळी चिन्ह वाटपाची प्रक्रिया सुरू झाली. बहुतांश ठिकाणी तासाभरातच चिन्ह वाटपाची प्रक्रिया संपली. अनेक ठिकाणी एकाच चिन्हासाठी अनेक उमेदवारांची मागणी होती. मागणी केलेले चिन्ह आणि प्रत्यक्ष मिळालेल्या चिन्हाबाबत काही ठिकाणी नाराजीचे सूर दिसले. काहींनी याबाबत निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे विचारणा केली; मात्र नियमानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करत चिन्ह वाटप करण्यात आल्याचे सांगत अधिकार्यांनी ही प्रक्रिया आणि झालेली कार्यवाही सांगत उमेदवारांच्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.
हुपरी नगरपरिषदेत चिन्ह वाटपावरून गोंधळ झाला. एकाच आघाडीतील दोन उपआघाड्यांतील उमेदवारांना एक चिन्ह देण्यात आले होते. त्याबाबत हरकत घेण्यात आल्यानंतर चिन्ह वाटप प्रक्रिया स्थगित करत सायंकाळी पाच वाजता पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याला दुपारी चिन्ह मिळालेल्या उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. रास्ता रोको करत निवडणूक निर्णय अधिकार्यांना धमकीही देण्यात आली. यामुळे पोलिस बळाचा वापर करण्यात आला.
प्रचाराचा धडाका सुरू
चिन्ह मिळताच उमेदवार, समर्थकांच्या प्रचाराचा वेग वाढला. चिन्हांची प्रतिकृती, चिन्हांसह पत्रके, बॅनर्स, स्टीकर आदींसह प्रचाराचे विविध साहित्य तयार करण्यास ठिकठिकाणी गर्दी झाली होती. याकरिता आवश्यक परवानगी घेण्यासाठीही दुपारपासूनच निवडणूक कार्यालयात धावपळ सुरू झाली होती. सायंकाळपर्यंत चिन्हांसह प्रचार साहित्य तयार करून अनेकांनी चिन्हांसह प्रचाराला सुरुवात केली.
उमेदवारांसह नेत्यांचीही कसोटी
नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, त्याकरिता सुरू असलेल्या जाहीर प्रचाराची रविवारी (दि. 30) सायंकाळी पाच वाजता सांगता होणार आहे. दरम्यान, बुधवारी चिन्ह मिळाल्याने प्रचारासाठी आता केवळ चारच दिवस मिळणार आहेत. या चार दिवसांत प्रत्येक मतदारापर्यंत चिन्ह पोहोचवण्याची उमेदवारांसह नेत्यांचीही मोठी कसोटी आहे. चिन्हासह प्रचार करून घराघरांत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी चार दिवसांचे नियोजन केले आहे. त्यानुसार गुरुवारपासून प्रचाराचा जोर वाढणार आहे.