कोल्हापूर महापालिका  Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur News : महापालिकेचा वर्कशॉप विभाग खिळखिळा

जेसीबी, बूम, डंपर, टँकरांची कमतरता, कचरा उठाव, दुरुस्ती व स्वच्छता कामांवर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

डॅनियल काळे

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचा वर्कशॉप विभाग दिवसेंदिवस खिळखिळा होत चालल्याने शहरातील मूलभूत सेवा-सुविधांवर परिणाम होऊ लागला आहे. महापालिकेच्या वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती करणारा हा विभाग प्रशासनाचा कणा मानला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत या विभागाकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने आता परिस्थिती ‌‘असून खोळंबा, नसून अडचण‌’ अशी झाली आहे.

दहा वर्षांनंतर नव्या सभागृहाचे कामकाज सुरू झाले असताना नव्या नगरसेवकांसमोरच अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. प्रभागांची भौगोलिक व्याप्ती वाढली असून पाच वर्षे निवडणुका न झाल्यामुळे अनेक कामे प्रलंबित आहेत. ही कामे करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग््राीच उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत असून नव्या नगरसेवकांना रोषाला सामोरे जावे लागत आहे.

महापालिकेकडे सध्या केवळ दोनच जेसीबी मशिन उपलब्ध असल्याने विविध विभागांची कामे करण्यासाठी नगरसेवकांना अक्षरशः प्रतीक्षा करावी लागते. बूम, डंपर, ट्रॅक्टर ट्रॉली आणि पाण्याचे टँकर यांचीही मोठी कमतरता आहे. किमान प्रत्येक विभागीय कार्यालयाला एक जेसीबी आणि एक बूम उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे मत नगरसेवक व्यक्त करीत आहेत. पाणीपुरवठा आणि पवडी विभागाकडेही स्वतंत्र जेसीबी असणे गरजेचे आहे. या सर्व साधनसामग््राीच्या अभावामुळे शहरातील सेवा-सुविधा विस्कळीत झाल्या असून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सार्वजनिक स्वच्छतागृहांना पाण्याचा टँकर नाही

शहरातील दाट लोकवस्तीमध्ये असलेल्या सार्वजनिक शौचालये व स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यासाठी पूर्वी आरोग्य विभागाकडे स्वतंत्र पाण्याचा टँकर होता. त्या टँकरच्या माध्यमातून नियमित स्वच्छता केली जात होती. मात्र सध्या हा टँकर उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी स्वच्छतागृह परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कचरा उठावावरही परिणाम

कचरा उठावासाठी वापरली जाणारी टिप्पर वाहने वारंवार नादुरुस्त होत आहेत. त्यांच्या देखभालीचे प्रश्नही प्रलंबित आहेत. परिणामी शहरातील अनेक भागात कचऱ्याचे कोंडाळे तयार होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ‌‘कोंडाळेमुक्त शहर‌’ ही संकल्पना काही वर्षांपूर्वी राबविण्याचा निर्णय घेतला असला तरी साधनसामग््राीच्या अभावामुळे त्याचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.

दुरुस्तीची प्रक्रियाच ठप्प

वर्कशॉप विभागात कुशल मनुष्यबळाची कमतरता असून स्पेअर पार्ट खरेदीसाठीही पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक वाहने दुरुस्तीअभावी पडून आहेत. काही वेळा स्पेअर पार्टची गरज भासल्यास जुन्या वाहनांमधून काढून काम चालवले जात आहे. परिणामी अनेक वाहने वापरण्यायोग्य राहिलेली नसून स्क्रॅप करण्याची वेळ आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT