कोल्हापूर ः कोल्हापूर महापालिकेच्या तिजोरीत वर्षभरात तब्बल 524 कोटी जमा झाले. नगररचना विभाग सर्वाधिक म्हणजे तब्बल 118 कोटींपेक्षा जास्त रक्कम वसूल करून टॉपला आहे. घरफाळा आणि पाणीपट्टी विभागाने चांगली वसुली केल्याने यंदा पाचशे कोटींचा आकडा पार झाला. घरफाळा आणि पाणीपट्टी सवलत योजनेनेही महापालिका प्रशासनाला वसुलीसाठी हातभार लावला. दरम्यान, कर भरण्यासाठी महापालिकेच्या सर्व सुविधा केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. घरफाळ्यातून 70 कोटी जमा
2025-26 या आर्थिक वर्षात प्रशासनाला 635 कोटी महसुली उत्पन्नाचे उद्दिष्ट होते. यात नगररचना विभाग 100 कोटींहून जास्त, घरफाळा 111 कोटी, पाणीपट्टी 87 कोटी आदीसह इतर विभागांना कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी नगररचना विभागाने 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत तब्बल 118.43 कोटी वसूल करण्यात यश मिळविले. त्या खालोखाल घरफाळा विभाग 70 कोटी तर पाणीपट्टी विभागाने 47 कोटी वसुली केली.
सवलत योजनेतून 12 कोटी जमा
महापालिकेने यंदाच्या वर्षी घरफाळा आणि पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी दंडात 80 टक्के सवलत योजना लागू केली होती. 26 ते 31 मार्च या कालावधीत योजना झाली. सवलत योजनेचा 3 हजार 564 थकबाकीदार नळ कनेक्शनधारकांनी लाभ घेतला. त्यांतर्गत 3 कोटी 23 लाख 40 हजार रु. महापालिकेने वसूल केले. तसेच 6 हजार 915 मिळकतधारकांनी लाभ घेतल्याने घरफाळा विभागाकडे 8 कोटी 81 लाख 58 हजार रु. जमा झाले.