महापालिका आणि आयआयटी मंडी यांच्यातील सामंजस्य करारप्रसंगी महापौर रूपाराणी निकम, आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, डॉ. सत्त्वशील पोवार. शेजारी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, डॉ. अमित शुक्ला व इतर.  
कोल्हापूर

Kolhapur News : कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिका-आयआयटी मंडी यांच्यात सामंजस्य करार

शहरातील समस्यांवर तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून तोडगा निघणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर ः कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी महापालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महापालिकेने देशातील अग््रागण्य तांत्रिक संस्था आयआयटी मंडी यांचे थेट तांत्रिक मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सोमवारी (दि. 13) महापालिका व आयआयटी मंडी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. त्यामुळे शहरातील समस्यांवर तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून तोडगा काढण्यात येणार आहे.

महापौर रूपाराणी निकम यांच्या पुढाकारातून ही संकल्पना साकार झाली असून आधुनिक, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित शहर बनविण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रमास, महापौर निकम, आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपमहापौर अक्षय जरग, आयआयटी मंडीचे डीन (फायनान्स) डॉ. सत्त्वशील पोवार, डॉ. अमित शुक्ला व हर्षवर्धन साळुंखे उपस्थित होते.

देशातील स्मार्ट सिटी मॉडेलकडे वाटचाल...

देशातील विविध स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये आयआयटी संस्थांचे तांत्रिक सहकार्य घेतले जाते. शहरी नियोजन, कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.), इंटरनेट ऑफ थिंग्स (आय. ओ. टी.), डेटा ॲनालिटिक्स व पर्यावरण व्यवस्थापन या क्षेत्रांतील आय.आयटीचा अनुभव कोल्हापूरच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर आयआयटी मंडीसोबतचा हा करार शहराच्या प्रगतीसाठी ‌‘गेम चेंजर‌’ ठरण्याची अपेक्षा आहे.

अंबाबाई नवरात्रौत्सव, जोतिबा यात्रेत यशस्वी प्रयोग...

आयआयटी मंडीने यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासोबतच्या सहकार्यांतर्गत नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदिर परिसरात ए. आय. आधारित गर्दी व्यवस्थापन प्रणाली यशस्वीपणे राबविली होती. तसेच अलीकडील जोतिबा यात्रेतही ही प्रणाली प्रभावीपणे वापरण्यात आली. या दोन्ही उपक्रमांना प्रशासन व नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून गर्दी व्यवस्थापन अधिक सुरक्षित व सुकर झाले आहे.

आयआयटी मंडीचा अनुभव शहराच्या विकासाला बळ

आयआयटी मंडी देशातील अग््रागण्य आयआयटींपैकी एक आहे. स्मार्ट सिटी उपाययोजना, ए.आय., ड्रोन तंत्रज्ञान व अर्बन इनोव्हेशन क्षेत्रात त्यांना मोठा अनुभव आहे. कोल्हापूरला जागतिक दर्जाचे तांत्रिक मार्गदर्शन मिळणार असून शहर अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक व नागरिक-केंद्रित बनण्यास मदत होणार आहे. मनपाचा हा निर्णय शहराच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणारा परिवर्तनाचा टप्पा आहे, असे महापालिकेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT