कोल्हापूर : बदलत्या काळानुसार महापालिकेचा कारभारही हळूहळू बदलत आहे. क्यूआर कोडचा जमाना सुरू असल्याने कॅशलेस व्यवहार होत आहेत. त्यामुळेच महापालिकेनेही घरफाळा भरण्यासाठी आता बिलावर क्यूआर कोड छापले आहेत. ग्राहकांना बिल मिळाल्यानंतर फक्त क्यूआर कोड स्कॅन करून घरफाळा भरता येणार आहे. परिणामी, नागरिकांचा मानसिक त्रास अन् वेळेची बचत होणार आहे. दरम्यान, 2025-26 या आर्थिक वर्षातील घरफाळा बिलासाठी महापालिकेने 30 जूनपर्यंत 6 टक्के सवलत योजना जाहीर केली आहे.
महापालिकेच्या घरफाळा वसुली विभागाकडील 2025-26 या आर्थिक वर्षासाठीची सुमारी दीड लाखांवर बिले जनरेट करण्यात आली आहेत. ही बिले पोस्ट खात्यामार्फत (भारतीय डाक विभाग) शहर हद्दीतील मिळकतधारकांना वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बिल ऑनलाईन पे करण्यासाठी यावर्षीपासून क्यूआर कोड छपाई करण्यात आला असून त्याद्वारेदेखील घरफाळा भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर गुगल पे, फोन पे, पेटीएम व कोल्हापूर महापालिकेची वेबसाईट (https:/// propertytax. kolhapurcorporaction. gov. in/ KMCOnlinePG/ PropSearch. aspx) यावर देखील ऑनलाईन पद्धतीने कर भरता येणार आहे. नागरी सुविधा केंद्रामध्ये ज्ञळेी मशिनद्वारे ऑनलाईन घरफाळा भरणा करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, अशी माहिती महापालिकेने पत्रकाद्वारे दिली आहे.