कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदासाठी शुक्रवारी (6 फेब्रुवारी) निवडणूक होणार असून, सोमवारी (2 फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना, तसेच काँग्रेसच्या गटनेत्यांनी महापालिकेतून उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. दरम्यान, महापौरपदासाठी भाजपमधून कुणाला संधी मिळणार, याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, शनिवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत महापौर व उपमहापौरपदासाठीची नावे निश्चित होण्याची शक्यता आहे. भाजपकडून रूपाराणी निकम, विजयसिंह खाडे-पाटील, विजय देसाई, प्रमोद देसाई, वैभव कुंभार आणि सुरेखा ओटवकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. शिवसेनेला उपमहापौरपद निश्चित असले तरी त्या पदासाठीची नावे अद्याप ठरलेली नाहीत.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा निकाल 16 जानेवारीला जाहीर झाला. काँग्रेसचे 34, भाजप 26, शिवसेना 15, राष्ट्रवादी काँग्रेस 4, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) 1 आणि जनसुराज्य 1 असे नगरसेवक निवडून आले. 81 सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात बहुमतासाठी 41 नगरसेवकांची आवश्यकता असते. सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेसकडे बहुमत नाही, तर महायुतीची एकूण संख्या 46 असल्याने महायुतीने महापौरपदावर दावा केला आहे. तर सत्तावाटप फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला उपमहापौरपद मिळणार आहे.
सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करायचे असल्याने काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी महापौर व उपमहापौरपदासाठी प्रत्येकी दोन अर्ज नेले आहेत. शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी महापौरपदासाठी दोन व उपमहापौरपदासाठी दोन अर्ज घेतले आहेत. भाजपकडून गटनेते मुरलीधर जाधव यांनी महापौरपदासाठी दोन उमेदवारी अर्ज नेले आहेत. शनिवारी होणार्या महायुतीच्या बैठकीत सत्तावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित होणार असून, त्यानुसार महापौरपदासाठीची नावे जाहीर केली जाणार आहेत.