सतीश सरीकर
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या विकासाचा गाडा हाकण्याची शपथ घेऊन सत्तेवर बसलेल्या महायुतीतील गटनेत्यांनी महापालिका म्हणजे अक्षरशः कुस्तीचा आखाडा केला आहे. पदांच्या लाथाळीतून पेटलेला शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास यांच्यातील वाद आता थेट रस्त्यावरच्या गुंडगिरीच्या आणि शिवीगाळीच्या पातळीवर पोहोचला आहे.
महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या समोरच एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, अश्लाघ्य भाषेत धमक्या देणे आणि ‘चौकात बघून घेण्याचे’ आव्हान देणे, असा लज्जास्पद प्रकार घडल्याने महायुतीतील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली आहे.
परिवहनच्या मलाईवरून पहिली ठिणगी
या संघर्षाची पहिली ठिणगी परिवहन समिती सभापती निवडीवरून पडली होती. सत्तेत भागीदार असलेल्या या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना जास्तीत जास्त पदांवर ताबा हवा होता. तिथून सुरू झालेली चढाओढ आता वैयक्तिक इर्षेत आणि शत्रुत्वात रूपांतरित झाली आहे. या दोघांत आतापर्यंत एकापाठोपाठ एक तीनवेळा तुंबळ वाद झाला असून, प्रत्येक सभेत हे नेते एकमेकांना भिडताना दिसत आहेत. सामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न, रस्त्यांचे खड्डे, पाण्याचा प्रश्न यावर चर्चा करण्याऐवजी या दोन्ही गटनेत्यांची ‘तू-तू, मै-मै’ आणि एकमेकांना आव्हान पाहायला मिळत आहे.
महापौर, आयुक्तांच्या डोळ्यांदेखत गुंडगिरीची भाषा
सभागृहाचे सर्वोच्च पद असलेल्या महापौर आणि प्रशासकीय प्रमुख असलेल्या आयुक्तांच्या उपस्थितीतच या दोन्ही नेत्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. भरसभेत एकेरी भाषेचा वापर करत 'तुला चौकात बघून घेतो', 'तुझी औकात काय' अशा गल्ली-बोळातील भाईंसारख्या धमक्या दिल्या जात आहेत. एकमेकांच्या दिशेने आक्रमकपणे धावून जाण्याचा हा नंगानाच पाहून सभागृहातील उपस्थितही थक्क होत आहेत. लोकशाहीच्या मंदिरात जनतेच्या पैशावर चालणाऱ्या सभेचा असा तमाशा बनवण्याचा अधिकार या नगरसेवकांना कुणी दिला, असा संतप्त सवाल महापालिका चौकात विचारला जात आहे.
जनतेच्या विश्वासावर सत्ताधाऱ्यांचा घाव
देशमुख आणि फरास यांच्या या वैयक्तिक अहंकाराच्या लढाईत संपूर्ण महापालिका वेठीस धरली गेली आहे. दोघांमधील वाढत्या वादाने महापालिकेचे कामकाज ठप्प होत आहे. या गटनेत्यांना सभागृहात जनतेचे प्रश्न सोडवता येत नसतील आणि केवळ स्वतःच्या खुमखुमीसाठी राडेच घालायचे असतील, तर त्यांनी नगरसेवकपदाचे राजीनामे देऊन थेट कुस्तीच्या मैदानात उतरावे. महायुतीतील या बेताल आणि आक्रमक गटगटनेत्यांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे. वरिष्ठ नेतेमंडळी हा वाद कसा मिटवणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.