Kolhapur municipal corporation Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur Municipality | घरफाळा थकबाकीदारांवर महापालिकेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

८० कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी थेट घरात जाऊन जप्तीच्या नोटिसा

पुढारी वृत्तसेवा

सतीश सरीकर

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून घरफाळा थकवून महापालिकेचा महसूल बुडवणाऱ्या मिळकतधारकांविरुद्ध कोल्हापूर महापालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार आवाहन आणि नोटिसा देऊनही घरफाळा भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शहरातील तब्बल १० हजारांहून अधिक बड्या थकबाकीदारांना महापालिकेने थेट ‘मालमत्ता जप्ती’च्या अंतिम नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू केली आहे. प्रशासनाच्या या सर्जिकल स्ट्राईक कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून कर चुकवणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दरवर्षी १०० कोटी जमा

कोल्हापूर शहरात १ लाख ७१ हजारांहून अधिक अधिकृत मिळकतींची नोंद आहे. या मिळकतींच्या माध्यमातून दरवर्षी महापालिकेच्या तिजोरीत घरफाळ्यापोटी सुमारे १०० कोटींचा महसूल जमा होतो. शहरातील रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यासाठी हा महसूल अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

८० कोटींपेक्षा जास्त थकबाकी

गेल्या काही वर्षांत अनेक मिळकतधारकांनी घरफाळा भरण्याकडे पाठ फिरवली आहे. परिणामी, हजारो थकबाकीदारांकडे तब्बल ८० कोटींहून अधिक रक्कम थकीत आहे. मोठ्या प्रमाणावर महसूल अडकून पडल्याने शहराच्या अनेक विकासकामांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब गांभीर्याने घेत महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार घरफाळा विभागाने थकबाकी वसुलीसाठी कडक मोहीम हाती घेतली आहे.

1. मुदतीत थकबाकी न भरल्यास प्रशासनाकडून खालीलप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल...

2. मालमत्ता सील करणे : संबंधित मिळकतींना टाळे ठोकून त्या महापालिकेच्या ताब्यात घेतल्या जातील.

3. पाणी आणि ड्रेनेज कनेक्शन खंडित : थकबाकीदारांच्या घरांचे आणि व्यावसायिक आस्थापनांचे नळ आणि सांडपाणी जोडणी त्वरित तोडली जाईल.

4. लिलावाची प्रक्रिया : जप्त केलेल्या मिळकतींचा जाहीर लिलाव करून थकबाकीची रक्कम थेट महापालिकेच्या तिजोरीत जमा केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT