कोल्हापूर महापालिका Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur News : साडेपाच वर्षांनी मनपामध्ये आज सवालांचा रणसंग्राम

शाहू सभागृहात राजकीय ठिणग्या उडणार; महाडिक-सतेज संघर्षाची छाया

पुढारी वृत्तसेवा

डॅनियल काळे

कोल्हापूर ः साडेपाच वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर आज अखेर कोल्हापूर महानगरपालिकेचे राजर्षी छत्रपती शाहू सभागृह पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांनी दुमदुमणार आहे. सभागृहात जनतेच्या प्रश्नावर रणसंग््रााम होण्याची शक्यता आहे. 2015 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत नोव्हेंबर 2020 मध्ये संपल्यानंतर जागतिक निर्बंधांचा काळ आणि ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन तिढ्यामुळे निवडणुका लांबल्या. जानेवारी 2026 मध्ये निवडणूक पार पडली. पहिल्या बैठकीत महापौर-उपमहापौरांची निवड झाली आणि आता शुक्रवारी (दि. 20) पहिली नियमित सभा होत आहे.

सभागृह तापणार?

साडेपाच वर्षे ‌‘व्यासपीठ‌’ नसल्याने साचलेली अस्वस्थता आज सभागृहात व्यक्त होणार असून, विषयपत्रिकेवरील कामकाजानंतरचा प्रश्नोत्तरांचा तास सर्वाधिक गाजण्याची शक्यता आहे. साडेपाच वर्षांचा ‌‘बेक‌’ आणि बदललेली राजकीय समीकरणे यामुळे आजची सभा केवळ औपचारिक राहणार नाही, तर ती आक्रमक चर्चेची रंगतदार सुरुवात ठरण्याची चिन्हे आहेत. जनतेच्या अपेक्षा प्रचंड आहेत. प्रश्नांची संख्या मोठी आहे आणि सत्ताधारी-विरोधक आमनेसामने उभे ठाकल्याने राजर्षी छत्रपती शाहू सभागृह आज खऱ्या अर्थाने ‌‘जनतेचा दरबार‌’ ठरणार का, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

महिलांची लक्षणीय उपस्थिती

81 पैकी 43 महिला सदस्य असल्याने महिलांशी संबंधित प्रश्न, सुरक्षितता, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, स्वच्छता या विषयांवर ठोस आवाज उठण्याची अपेक्षा आहे.

‌‘प्रश्नांचा स्फोट‌’ ठरणार प्रश्नोत्तरांचा तास

प्रभागात फिरताना आणि निवडणुकीदरम्यान नागरिकांनी मांडलेल्या शेकडो तक्रारींची यादी प्रत्येक नगरसेवकाच्या हातात आहे. साडेपाच वर्षे अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही न सुटलेले प्रश्न आता थेट सभागृहात मांडले जाणार आहेत. शहराच्या राजकारणात गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेला महाडिक विरुद्ध सतेज पाटील हा संघर्षच सभागृहात ठळकपणे उमटणार, अशी चर्चा आहे.

चर्चेचे प्रमुख मुद्दे

  • रस्त्यांची दुरवस्था व प्रलंबित कामे

  • पाणीपुरवठ्याची अनियमितता

  • कचरा उठाव व स्वच्छता समस्या

  • वाहतूक कोंडी व पार्किंगचा बोजवारा

  • गटर्स, ड्रेनेज लाईनची रखडलेली कामे

  • प्रश्न सुटत नसल्याने अधिकाऱ्यांना जाब विचारणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT