कोल्हापूर ः महापालिका प्रशासनाचा 10 ते 20 टक्के पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव अखेर आक्रमक नगरसेवकांनी फेटाळला. परंतु, सभागृहात पाणी प्रश्नावरून प्रचंड गोंधळ झाला. महायुतीचे घटकपक्ष शिवसेना गटनेता शारंगधर देशमुख व राष्ट्रवादी गटनेता आदिल फरास यांच्यात तुफान हमरीतुमरी झाली. महापौर रूपाराणी निकम, आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्यासमोरच दोघांनी शड्डू ठोकून एकमेकांना चौकात येण्याचे आव्हान-प्रतिआव्हान देत बघून घेण्याचा इशारा दिला. बुधवारी (दि. 18) महापालिका सभागृहाचा आखाडा होऊन वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनले होते.
महापालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांतून पाण्याचा वापर करत असलेल्या गावांतील नागरिकांना रीतसर नळ कनेक्शन द्यावे, असा सदस्य ठराव देशमुख यांनी दाखल केला होता. त्यावर चर्चा सुरू असताना देशमुख व फरास यांच्यात हमरीतुमरी झाली. दरम्यान, सभेतून उठून सुमारे एक तास देशमुख महापालिका चौकात फरास यांची वाट पाहत थांबले होते. परंतु, फरास सभागृहातून न आल्याने देशमुख निघून गेले.
शड्डू ठोकून एकमेकांना चौकात येण्याचे आव्हान
देशमुख व फरास एकमेकांना एकेरी भाषा वापरून मला शहाणपण शिकवू नकोस, मीपण निवडून आलोय... तुझ्यासारखी लई बघितल्यात... माझ्यासमोर तुझी दादागिरी चालणार नाही... काय करायचे ते कर, मी भीत नाही..., असे आव्हान-प्रतिआव्हान देऊन शड्डू ठोकत एकमेकांना आव्हान देत होते. महापौर निकम दोघांनाही वारंवार शांत राहण्याचे आवाहन करत होत्या. अखेर नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, स्थायी सभापती विशाल शिराळे, विजय जाधव, रत्नेश शिरोळकर, विजय खाडे, मुरलीधर जाधव आदींनी हस्तक्षेप करून दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही देशमुख व फरास एकेमकांकडे बघून, त्याला पहिल्यांदा गप्प बसायला सांगा, नाहीतर चौकात यायला सांगा, असे आव्हान देत होते.
फरास यांनी, बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये, असे म्हणत तीन पिढ्यांपासून सभागृहात असल्याचे सांगितले. तर देशमुख यांनी, मराठा औलाद असून, कुठे यायचे सांग येतो, असे आव्हान देत त्याच त्याच विषयावर सभागृहाचा किती वेळ घेणार, सगळ्यांनी तुझे किती ऐकायचे, अशी विचारणा केली.