Kolhapur municipal election File Photo
कोल्हापूर

Kolhapur municipal election: विरोधक झाले मित्र... मित्र झाले विरोधक!

राज्यातील सत्तांतरानंतरचा पुढचा अंक महानगरपालिका निवडणुकीत

पुढारी वृत्तसेवा
चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासूनच गाजत आहेत. विसर्जित महापालिकेत सतेज पाटील, हसन मुश्रीफ व राजेश क्षीरसागर एकत्र होते. नंतरच्या काळात त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. आता सतेज पाटीलविरुद्ध हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर व विनय कोरे, असा सामना होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर महापालिकेचे राजकारण आपल्या हाती ठेवणे प्रत्येक नेत्याला हवे असते. त्यातूनच निवडणुकीत चुरस तयार होते. नेत्यांना धक्केही दिले जातात. सगळे काही वर्चस्वासाठी, अशी स्थिती आहे. साधारणपणे पूर्वीचे सत्ताधारी व पूर्वीचे विरोधक, असा सामना असतो.

यंदा मात्र त्याला छेद मिळाला आहे. महापालिकेच्या सत्तेत जे एकत्र होते त्यांच्यावरच एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकण्याची वेळ आली आहे. सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर व विनय कोरे यांची महापालिकेत सत्ता होती. मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर हे चित्र बदलले आहे. सतेज पाटील यांच्याविरोधात आता मुश्रीफ, क्षीरसागर व कोरे यांना निवडणूक लढवावी लागणार आहे.

एवढेच नव्हे, तर ज्या महाडिक यांच्याविरोधात या सर्व नेत्यांनी महापालिकेत सत्तांतर घडवून आणले, त्याच महाडिक यांच्याबरोबर त्यांना आता महापालिकेच्या सत्तेसाठी लढावे लागणार आहे. दहा वर्षांपूर्वी महापालिकेच्या सत्तेतून चंद्रकांत पाटील व राजेश क्षीरसागर यांच्यात संघर्ष झाला होता व आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या त्या पाटील यांना सोबत घेऊन क्षीरसागर यांना लढावे लागणार आहे.

निवडणुकीसाठी नेत्यांनी लावली बाजी

स्वबळाची भाषा करत करत नेते आता महायुती म्हणून लढण्याच्या भूमिकेपर्यंत एकत्र आले आहेत. या एकत्र लढण्याच्या भूमिकेने मित्रांचे विरोधक व विरोधकांचे मित्र झाले आहेत. आता याच भूमिकेतून जी काही राजकीय उलथापालथ झाली आहे त्याचा पुढचा अंक महापालिका निवडणुकीत रंगणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या संघर्षात नेत्यांनी बाजी लावली आहे. आता जनता कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार, त्यावर सत्तासंघर्षाचा निर्णय लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT