कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, इच्छुक माजी नगरसेवक व मातब्बर नेत्यांना राजकीय पक्षांकडून खुलेआम ऑफर्स दिल्या जात आहेत. आमच्याकडे या, ताकद देतो, उमेदवारी देतो, अशा शब्दांत आमिष दाखवले जात असून, महायुती व महाविकास आघाडी यांच्यात सत्ताप्राप्तीसाठी जोरदार शर्यत सुरू झाली आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीत गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीही सत्ता राखण्यासाठी मैदानात उतरली आहे. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा प्रमुख दावेदार आहे. तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष (शरद पवार गट) हे त्यांच्या साथीला आहेत. त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत रंगणार हे निश्चित.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा रंग उधळण्याची तयारी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांची कसोटी घेणार्या बहुसदस्यीय प्रभाग रचनेत जिंकण्यासाठी ताकदवान टीम तयार करणे हाच सर्व पक्षांचा मुख्य हेतू आहे. यामध्ये जो लवकर निर्णय घेईल, तोच पुढे जाईल. त्यामुळे इच्छुकांसमोर हे एक नवे आव्हान ठरते आहे. चारही उमेदवार बळकट असणे आवश्यक आहे; अन्यथा पूर्ण पॅनलला फटका बसू शकतो. त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा क्षेत्रातील उपनगरात जम्बो प्रभाग होणार आहेत. शेवटच्या प्रभागात पाच नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यामुळे त्या विशिष्ट प्रभागावर पक्षांचे लक्ष आहे. बहुसंख्य नगरसेवक निवडून आणण्यासाठी उपनगर निर्णायक ठरणार. त्यामुळे उपनगरावर डावपेच सुरू केले आहेत.