चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील प्रत्येक घटक पक्ष 30 पेक्षा कमी जागा घेण्यास तयार नाही. जागा वाटपाची चर्चा होण्यापूर्वीच पक्षांनी जागांचा आकडा ठरविल्याने जागा वाटपाचा पेच वाढणार आहे. यामध्ये घटक पक्षांनी मित्र पक्षांचा विचारच अद्याप केलेला नाही. त्यामुळे ताणाताणी अधिकच होणार असून जनसुराज्य शक्ती पक्षाने आपल्या पक्षाची शक्तिस्थाने असलेल्या जिल्ह्यात उमेदवार देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जागा 81 आणि तीन पक्षांची मागणी 90 च्या पुढे अशी महायुतीची स्थिती आहे.
कोल्हापूर महापालिकेतील वर्चस्वासाठी सर्वच पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावण्याचे ठरविले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सामना झडण्यापूर्वीच महायुतीतील घटक पक्षातच जागा मागणीवरून जुंपली आहे. जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभेला मिळालेल्या यशानुसार जागा वाटप करावे, अशी मागणी शिंदे शिवसेनेतून पुढे येत आहे. त्यांच्या पक्षाकडे एक खासदार, चार आमदार असे संख्याबळ आहे. पालकमंत्रिपदही याच पक्षाकडे आहे. भाजपकडे एक राज्यसभा खासदार, दोन पक्षाचे एक सहयोगी असे तीन आमदार, जनसुराज्य शक्ती पक्षाचे दोन आणि अजित पवार राष्ट्रवादीचे एक असे राजकीय बलाबल आहे.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या मेळाव्यात यांनी कोल्हापूर महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकला पाहिजे. 33 पेक्षा कमी जागा आम्ही घेणार नाही, अशी जाहीर भूमिका मांडल्यानेच चर्चा सुरू झाली. त्या पाठोपाठ शिंदे शिवसेनेच्या बैठकीत 33 पेक्षा कमी जागा घ्यायच्याच नाहीत, असा सूर आळवला. उर्वरित जागा राष्ट्रवादीला द्यायच्या अशी चर्चा सुरू झाली. अजित पवार राष्ट्रवादीने तातडीने भूमिका मांडत अद्याप जागा वाटपाची बोलणी सुरू नाही. त्यामुळे या दावेदारीला अर्थ नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी 30 पेक्षा कमी जागा आपण घ्यायच्या नाहीत, अशी अजित पवार राष्ट्रवादीची भूमिका आहे.