सतीश सरीकर
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हालचाली आता उघडपणे रणधुमाळीत बदलल्या असून, सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विशेषतः, राज्यात सत्तेत असलेली महायुती ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आहे. तरी प्रत्यक्षात मात्र भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही घटकपक्षांमध्ये ‘नंबर वन’ होण्याची चढाओढ सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष आपल्याच पक्षाचा महापौर व्हावा, यासाठी रणनीती आखत असून, सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यावरच सर्वांचा भर आहे.
महापालिकेवर दीर्घकाळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आणि राज्यातील सत्ता बदलानंतर यावेळी चित्र वेगळे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी हे एकत्र महायुती म्हणून निवडणूक लढणार असले, तरी स्थानिक पातळीवर मात्र आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘महायुती जिंकणारच, पण त्यात आमचा पक्ष सर्वाधिक जागा मिळवेल,’ असा दावा तिन्ही पक्षांचे स्थानिक नेते उघडपणे करत आहेत.
भाजपने गेल्या काही वर्षांत कोल्हापूर शहरात आपले संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. बूथ पातळीवर काम करणारी यंत्रणा, सोशल मीडियावरील आक्रमक प्रचार सरकारी योजनांचा उल्लेख करत भाजपने निवडणूक रणनिती आखली आहे. ‘यावेळी कोल्हापुरात भाजप पहिल्यांदाच नंबर वन होईल,’ असा विश्वास भाजप नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. शिवसेनाही पारंपरिक मतदारांवर आपला हक्क सांगत मैदानात उतरली आहे. कोल्हापूर शहरात अजूनही शिवसैनिकांची मजबूत पकड आहे. रंकाळा संवर्धन व सुशोभीकरणासाठी 25 कोटी, रस्त्यासाठी 100 कोटी आदीसह शहराच्या विकासासाठी पाचशे कोटींहून जास्त निधी आणल्याचे सांगितले जात आहे. ‘त्यामुळे महापौरपद शिवसेनेकडेच पाहिजे,’ अशी भूमिका मांडत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ही देखील कोल्हापुरात आपली ताकद कमी लेखून चालणार नाही, असा संदेश देत आहे. गेल्या महापालिकेत राष्ट्रवादीची संख्या लक्षणीय होती आणि अनेक अनुभवी नगरसेवक आहेत. त्यामुळे ‘महायुतीमध्ये सर्वाधिक जागा राष्ट्रवादीच जिंकेल,’ असा दावा नेते करत आहेत. एकूणच कोल्हापूर महापालिका निवडणूक ही महायुतीतील तिन्ही पक्षांची ताकद मोजण्याची लढाई ठरणार आहे. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातील ही ‘नंबर वन’ होण्याची रेस निवडणुकीपर्यंत अधिकच तीव— होण्याची चिन्हे आहेत. महायुती म्हणून एकत्र असले, तरी अंतर्गत स्पर्धा आणि आकांक्षा यामुळे ही निवडणूक कोल्हापूरच्या राजकारणात नवा अध्याय लिहिणारी ठरणार आहे. महापौरपदासाठीची चढाओढ हीदेखील महायुतीतील अंतर्गत स्पर्धेला धार देणारी ठरत आहे. ज्या पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील, त्याच पक्षाचा महापौर होईल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळेच तिन्ही पक्षांनी ‘नंबर वन’ होण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
जागावाटप ठरणार कळीचा मुद्दा
महायुती म्हणून निवडणूक लढवताना जागावाटप हा सर्वात कळीचा मुद्दा ठरणार आहे. कोणत्या पक्षाला किती जागा, कोणते प्रभाग सोडायचे आणि कोणते लढवायचे, यावरूनच तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. अनेक प्रभागांमध्ये तिन्ही पक्षांचे इच्छुक उमेदवार असल्याने अंतर्गत स्पर्धा वाढली आहे. ‘एकत्र लढायचे असले तरी स्थानिक समीकरणे लक्षात घेतली पाहिजेत,’ अशी भूमिका प्रत्येक पक्षाकडून घेतली जात असून, अंतिम निर्णयासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चेच्या फेर्या सुरू आहेत.