कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजप 36, शिवसेना 30 आणि राष्ट्रवादी 15 असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. संबंधित घटक पक्षांच्या वरिष्ठांकडे उमेदवारांच्या याद्या पाठविण्यात आल्या आहेत. मंगळवारी (दि. 30) 81 उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना नेते व पालकमंत्री प्रकाश आबिटकर, शिवसेना नेते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, भाजप नेते खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, महायुती, महाविकास व तिसरी आघाडी रिंगणात उतरल्याने रंगत येणार आहे.
खा. महाडिक म्हणाले, गेले आठ दिवस तीन पक्षांच्या नेते मंडळींच्या बैठका झाल्यानंतर राज्यात ऐतिहासिक निर्णय घेत कोल्हापुरात महायुती झाली. 81 जागांवर उमेदवार निश्चित केले आहेत. तीनही पक्षांच्या सक्षम उमेदवारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर शहराच्या विकासाचे व्हिजन घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. यात जनतेच्या अपक्षांचा समावेश असेल. विकासाचा रोडमॅप असल्याने आमच्यासाठी निवडणूक सोपी आहे. केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे राज्याच्या धर्तीवर कोल्हापूरचा विकास करू.
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता खा. महाडिक म्हणाले, विरोधकांकडून ‘कोल्हापूर कस्सं’ अशी टॅगलाईन घेऊन कोल्हापूरकरांची पुन्हा फसवणूक केली जात आहे. परंतु कोल्हापूर कस्सं... पाण्याची बोंब, कोल्हापूर कस्सं... रस्त्यांची लागलेली वाट हे काँग्रेसनेच केले आहे. प्रत्येकवेळी वेगवेगळी टॅगलाईन वापरून ते कोल्हापूरकरांची वारंवार फसवणूक करत आहेत.
मंत्री मुश्रीफ यांनी काँग्रेसवर टीका करताना मोठ्या गप्पा मारून निवडणुका जिंकता येत नाहीत. पॅनेलने निवडणूक होत असून क्रॉस व्होटिंग, सेटिंग, मिक्सिंग झाले आणि इतर उमेदवार पराभूत झाले तर विजयी उमेदवाराचा राजीनामा घेऊ, असे आमच्या मित्रांनी म्हटले आहे. परंतु नगरसेवकांचा असा राजीनामा घेता येत नाही हे बहुधा त्यांना माहिती नसावे, असा टोला काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांचे नाव न घेता हाणला.