सतीश सरीकर
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पहिल्यांदाच प्रभाग रचना बहुसदस्य पद्धतीने झाली आहे. परिणामी महापालिकेची निवडणूक पूर्णपणे बदलणार असून एका प्रभागातून चार चार नगरसेवक निवडून येणार आहेत. आतापर्यंत एक प्रभाग - एक नगरसेवक अशी पद्धत होती. प्रभागाचा नवा चेहरा, उमेदवारांसाठी नवा फेरा ठरणार आहे. पण आता चार नगरसेवक असल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत. उमेदवार, पक्ष, मतदार व स्थानिक पातळीवरील गट-तटबाजी सर्वच या बदलामुळे नव्या दिशेने जाणार आहेत.
भाजप, काँग्रेस, शिवसेना (शिंदे व ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार व शरद पवार गट) यांच्यासह स्थानिक पातळीवरील लहान पक्ष, अपक्ष उमेदवारही या निवडणुकीत उतरतील. मोठ्या पक्षांसाठी : प्रत्येक प्रभागात चार उमेदवार उभे करणे हेच एक मोठे आव्हान आहे. पक्षातील गटबाजी वाढण्याची शक्यता आहे. तिकीट न मिळालेल्यांची नाराजी अपक्ष उमेदवाराच्या रूपाने बाहेर पडू शकते. लहान पक्ष व अपक्ष : बहुसदस्य पद्धतीमुळे लहान पक्ष व अपक्ष उमेदवारांना संधी मिळू शकते. कारण मोठ्या पक्षाचे चारही उमेदवार निवडून येणे कठीण आहे. किमान एक-दोन जागा अपक्ष किंवा लहान पक्ष झटकून घेऊ शकतात.
मोठा प्रभाग, मोठी स्पर्धा : चार नगरसेवक निवडायचे असल्याने मतदार संख्या आणि क्षेत्रफळ दोन्ही वाढले आहे. परिणामी प्रत्येक उमेदवाराला दुप्पट मेहनत घ्यावी लागणार आहे. संघटनेवर भर : एकट्या व्यक्तीच्या प्रभावावर निवडणूक शक्य नाही. उमेदवाराला पक्ष संघटनेच्या बळावर निवडणुकीत उतरणे अपरिहार्य आहे. मतांचे विभाजन : एकाच प्रभागात एकाच पक्षाचे चार उमेदवार असणार. यामुळे मतांचे विभाजन होऊ नये यासाठी नीट समन्वय साधावा लागेल. गटबाजीवर नियंत्रण : स्थानिक गटबाजी, जाती-धर्माचे राजकारण यावर नियंत्रण ठेवून सर्वांना एकत्र घेण्याचे कौशल्य दाखवावे लागणार आहे.
चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे उमेदवारांचा कस लागणार आहे. विरोधाचे राजकारण कमी होईल. पक्षीय राजकारण मबजूत होईल. प्रभागांतील विकासकामांमुळे कोल्हापूर शहराच्या प्रगतीला गती येईल.स्मिता माने (माजी नगरसेविका)