Kolhapur Municipal Corporation  Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपात काँग्रेस गटनेतेपदी बोंद्रे; महायुतीच्या पक्षांची आज नोंदणी

भाजपकडून मुरलीधर जाधव, शिवसेनेचे शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीकडून आदिल फरास यांचे नाव गटनेतेपदासाठी निश्चित

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी नूतन नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांची मंगळवारी सर्वानुमते निवड करण्यात आली. यानिमित्ताने पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सहआयुक्त चंद्रकांत खोसे व उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत ही नोंदणी झाली.

दरम्यान, महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नगरसेवकांची गटनोंदणी बुधवारी (दि. 28) होणार आहे. प्रभाग क्रमांक 8 मधून विजयी झालेले इंद्रजित बोंद्रे हे आक्रमक आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या मातोश्री शोभा बोंद्रे यांनी यापूर्वी महापौरपद भूषवले असून, बोंद्रे कुटुंब गेल्या अनेक दशकांपासून महापालिकेच्या राजकारणात सक्रिय आहे. त्यांच्या या अनुभवाची दखल घेत काँग्रेसने तरुण नेतृत्वाला संधी देत बोंद्रे यांची गटनेतेपदी निवड केल्याचे मानले जाते.

खासदार शाहू महाराज, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे व ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे 34 नगरसेवक निवडून आले असून, महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे महापालिकेत सक्षम व प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यासाठी काँग्रेसने आक्रमक आणि तरुण चेहरा पुढे केल्याचे सांगितले जात आहे.

नगरसेवक राजेश लाटकर, संजय मोहिते, अर्जुन माने, दुर्वास कदम, प्रतापसिंह जाधव सरकार, अमर समर्थ, सुभाष बुचडे, विनायक कारंडे, विशाल चव्हाण, जयश्री जाधव, स्वाती यवलुजे, रुग्वेदा माने, रूपाली पोवार, दीपाली घाटगे, पुष्पा नरुटे यांच्यासह अन्य नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. दरम्यान, महायुतीमधील तिन्ही पक्षांची गटनोंदणी बुधवारी पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात होणार असून, भाजपचे नगरसेवक मुरलीधर जाधव, शिवसेनेचे शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी काँग््रेासचे आदिल फरास यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक सकाळी पुण्याला रवाना होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT