कोल्हापूर : कोल्हापूर-मुंबई मार्गावर सकाळी आणि रात्री अशा आणखी दोन विमानसेवा सुरू होणार आहेत. दि. 11 नोव्हेंबरपासून ही सेवा कोल्हापूरकरांना मिळणार आहे. यामुळे सकाळी मुंबईला जाऊन रात्री परत कोल्हापूरला येता येणार आहे.
कोल्हापूर-मुंबई मार्गावर सध्या एकच विमानसेवा आहे. ही विमानसेवा प्रारंभी सकाळच्या सत्रात सुरू होती. नंतर ती दुपारच्या सत्रात सुरू झाली आहे. यामुळे दैनदिन कामकाजासाठी जाणार्यांना या विमानसेवेचा लाभ होत नाही. तरीही या विमानसेवेलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोल्हापूर-मुंबई मार्गावर सकाळी आणि सायंकाळी अशा दोन विमानसेवा असाव्यात, अशी सातत्याने मागणी होत होती. इंडिगोने कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू करण्याची यापूर्वीच तयारी दर्शवली होती. मात्र, उडाण योजनेत कोल्हापूर-मुंबई हा मार्ग असल्याने, सध्याच्या विमान कंपनीच्या ना-हरकतीची अडचण होती. सप्टेंबर महिन्यात या मार्गावरील उडाण योजनेची मुदत संपत आहे. यामुळे या मार्गावर नव्या विमानसेवेचा अन्य विमान कंपन्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, इंडिगोने कोल्हापूर-मुंबईसाठी मागणी केलेल्या मार्गाला मंजुरी मिळाली असून येत्या दि.11 नोव्हेंबरपासून सकाळी आणि रात्री अशा दोन विमानसेवा कोल्हापूर-मुंबई आणि मुंबई-कोल्हापूर या मार्गावर उपलब्ध होणार आहेत. कंपनीची कोल्हापुरातून सकाळी सात वाजून 35 मिनिटांची वेळ आहे. विमानतळाकडून 8.30 या वेळेवर चर्चा सुरू आहे. मात्र, सकाळी सात वाजून 35 मिनिटांचीच वेळ निश्चित होईल, अशी शक्यता आहे.
कोल्हापूर-मुंबई मार्गावर आता सकाळी आणि रात्री विमानसेवा सुरू होणार असल्याने प्रवाशांना सकाळी लवकर मुंबईला जाता येणार आहे. दिवसभर काम आटोपून रात्री घरी परत येता येणार आहे.
मुंबई-कोल्हापूर (दररोज) पहाटे 6.05 टेक ऑफ होईल आणि कोल्हापुरात सकाळी 7 वाजता लँडिंग होईल. सकाळी 7 वा. 35 मिनिटांनी पुन्हा मुंबईसाठी टेक ऑफ होईल. सकाळी साडेआठ वाजता मुंबईत लँडिंग होणार आहे. मुंबईतून रात्री 7 वाजून 10 मिनिटांनी टेक ऑफ होईल व कोल्हापुरात रात्री आठ वाजून 5 मिनिटांनी लँडिंग होईल. कोल्हापुरातून रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी टेक ऑफ होईल आणि रात्री नऊ वाजून 35 मिनिटांनी मुंबईत लँडिंग होईल.
या दोन्ही फ्लाईट पैकी सकाळची फ्लाईट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ऑपरेट होणार आहे. यामुळे मुंबईहून सकाळी येताना आणि सकाळी जाताना सध्याच्या विमानतळावर जावे लागणार आहे. रात्री परतीची फ्लाईट मात्र, नवी मुंबई विमानतळावरून असेल. तसेच कोल्हापुरातून रात्री जाणारी फ्लाईट नव्या मुंबईत जाणार आहे.