कोल्हापूर : कोल्हापूर-मुंबई मार्गावर लवकरच सकाळी आणि सायंकाळी विमानसेवा सुरू होणार आहे. तसा प्रस्ताव कंपनीने दिला आहे. येत्या ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू होईल, अशी शक्यता आहे. यामुळे ऑक्टोबरनंतर कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी व मुंबईवरून कोल्हापूरला येण्यासाठी दररोज तीन फ्लाईट उपलब्ध होतील.
कोल्हापूर-मुंबई मार्गावर सध्या एकाच कंपनीची सेवा सुरू आहे. प्रारंभी सकाळी असणारी ही सेवा आता दुपारी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दररोज दुपारी तीन वाजता मुंबईसाठी फ्लाईट असल्याने प्रशासकीय कामकाजासाठी जाणार्यांना ही विमानसेवा गैरसोयीची ठरत आहे. त्याच या विमानसेवेच्या उडान योजनेतील तिकीट वगळता अन्य तिकिटांचे दर आव्वाच्या सव्वा असल्याने अनेकजण केवळ दहा-पंधरा हजार रुपयांच्या तिकिटामुळे या सेवेकडे पाठ फिरवत आहेत.
कोल्हापुरातून मुंबईला सकाळी जाऊन पुन्हा सायंकाळी कोल्हापूरला परत येता यावे, याद़ृष्टीने विमानसेवा असावी, अशी मागणी सातत्याने होत होती; मात्र प्रवाशांची ही मागणी आता लवकरच पूर्ण होईल अशी शक्यता आहे. सकाळी नऊ वाजता मुंबईहून येणारे विमान कोल्हापुरातून दहा वाजता पुन्हा मुंबईला जाईल आणि दुपारी साडेचार वाजता येणारे विमान कोल्हापुरातून साडेपाच वाजता पुन्हा मुंबईला जाईल अशा वेळापत्रकानुसार नव्या विमानसेवेचा प्रस्ताव दुसर्या कंपनीने सादर केला आहे.
उडान योजनेंतर्गत एका कंपनीची सेवा सुरू आहे, ती सुरू असताना दुसर्या कंपनीला त्याच मार्गावर सेवा सुरू करण्यास संबंधित कंपनीचे नाहरकत आवश्यक असते; पण या सेवेचा उडान योजनेचा कालावधी सप्टेंबरमध्ये संपत असल्याने दुसर्या कंपनीला सेवा सुरू करण्यास नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार नाही. यामुळे येत्या ऑक्टोबरपासून आमचीही सेवा सुरू होईल, असा विश्वास कंपनीच्या अधिकार्याने व्यक्त केला. सध्या सकाळी दहा आणि सायंकाळी साडे पाच अशी वेळ सुचवली आहे, ती सकाळी नऊ आणि रात्री सात-आठ अशी करता येईल काय, याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर-दिल्ली मार्गावरही विमानसेवा सुरू करण्याकरिता सुरक्षिततेच्या द़ृष्टीने सूचवण्यात आलेल्या त्रुटी दूर करण्यात येत आहेत. हे कामही लवकरच पूर्ण होणार असून कोल्हापूर-दिल्ली मार्गावरील विमानसेवाही सुरू होण्याची शक्यता आहे.