कोल्हापूर-मुंबई विमान प्रवास सर्वाधिक महागडा आहे. Kolhapur-Mumbai Air Travel
कोल्हापूर

कोल्हापूर-मुंबई विमान प्रवास सर्वाधिक महागडा!

दुबई, दिल्ली, कोलकाता, अंदमानपेक्षा जादा तिकीट दर; विमानसेवा सामान्यांच्या आवाक्याबाहेरच

पुढारी वृत्तसेवा
सुनील कदम

कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई अशी विमानसेवा सुरू झाली असली तरी ही सेवा देशातील सर्वाधिक महागडी ठरलेली दिसत आहे. परिणामी, विमानप्रवास अजून तरी सर्वसामान्य कोल्हापूरकरांच्या आवाक्याबाहेर असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

चार ऑक्टोबर 2022 पासून कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा नियमित सुरू झालेली आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे आठवड्यातील तीन दिवस ही सेवा उपलब्ध आहे. ही विमानसेवा सुरू झाली, त्यावेळी कोल्हापूर ते मुंबई या 40 मिनिटांच्या विमान प्रवासासाठी प्रतिप्रवासी 2573 रुपये तिकिटांचे दर होते. त्यामुळे ही विमानसेवा सर्वसामान्यांनाही परवडण्यासारखी होती. पण हळहळू कोल्हापूर-मुंबई विमान प्रवासाचे दर वाढत जाऊन आता प्रतिप्रवासी 17 ते 18 हजार रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य तर दूरच; पण श्रीमंत वर्गालाही हे दर न परवडणारे आहेत.

दुबईपेक्षा मुंबई महाग!

विशेष म्हणजे देशांतर्गत विमान प्रवासाचे इतके प्रचंड दर अन्यत्र कुठेही नाहीत. कोल्हापूर-मुंबई विमान प्रवासाच्या तिकिटाच्या दरात एक-दोन परदेश वार्‍यासुद्धा करता येतील इतके हे दर जास्त आहेत. मुंबई-दिल्ली, मुंबई-दुबई, मुंबई-व्हिएतनाम, मुंबई-अंदमान, नागपूर-मुंबई या विमान प्रवासाचे दरसुद्धा कोल्हापूर-मुंबई विमान प्रवासापेक्षा कमी आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई ते जळगाव अशी विमानसेवा सुरू झाली आहे. मुंबई-जळगाव विमान प्रवासाचे तिकीट दर दोन हजार रुपयांच्या आत-बाहेर आहेत, पण त्यापेक्षा कमी कालावधीच्या कोल्हापूर-मुंबई विमान प्रवासासाठी मात्र प्रवाशांना 17 ते 18 हजार रुपये मोजावे लागत आहेत.

अन्य कंपन्यांना संधी द्यावी!

कोल्हापुरातून मुंबईला सध्या जी विमानसेवा सुरू आहे, ती सर्व हाऊसफुल्ल आहे. काही वेळा तर अनेक प्रवाशांना तिकीट मिळू शकत नाही, म्हणजे इथे क्षमतेपेक्षा जादा प्रवासी उपलब्ध आहेत. ही बाब विचारात घेऊन कोल्हापुरातून इंडिगोसह अन्य काही विमान कंपन्या सेवा सुरू करण्यास तयार आहेत. मात्र शासकीय पातळीवरून त्यांना ‘ग्रीन सिग्नल’ दिला जात नाही. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या महागड्या सेवेशिवाय प्रवाशांपुढे पर्याय नाही. अन्य कंपन्यांनाही इथून उड्डाणाची परवानगी मिळाल्यास कोल्हापूर-मुंबई विमान प्रवास अडीच-तीन हजार रुपयांच्या घरात येण्याची शक्यता आहे.

अन्य ठिकाणी दरात कपात!

देशातील सात खासगी विमान कंपन्या देशांतर्गत विमानसेवा पुरवितात. या कंपन्या मागणी आणि पुरवठा या तत्त्वानुसार आपापल्या विमान प्रवासाचे दर निश्चित करीत असतात. अनेकवेळा या दरांमध्ये चढ-उतार होतात, पण कोल्हापूर-मुंबई विमान प्रवासाचे तिकीट दर मात्र फारसे कमी-जास्त होताना दिसत नाहीत. ऑक्टोबर 2024 मध्ये देशभरातील विमान कंपन्यांनी आपल्या तिकीट दरांमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी कपात केली होती, पण त्यावेळीसुद्धा कोल्हापूर-मुंबई विमान प्रवासाच्या तिकीट दरात फारशी कपात झालेली दिसून आली नव्हती.

सेवा बंद पडण्याचा धोका!

केंद्र शासनाने उडान योजनेंतर्गत देशभरातील प्रमुख शहरे हवाई मार्गाने जोडण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. सर्वसामान्यांना सुद्धा परवडतील अशा दरात विमान प्रवास उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा प्रयास आहे. त्या अनुषंगाने देशभरातील अनेक शहरांमधून विमान प्रवासाच्या सोयी परवडतील अशा दरात उपलब्ध झालेल्या आहेत. याच योजनेंतर्गत कोल्हापुरातून विमानसेवा तर सुरू झाली आहे; पण ती सर्वसामान्यांनाच काय, पण श्रीमंत वर्गालाही न परवडणारी ठरू लागली आहे. त्यामुळे केवळ विमान प्रवासाचे दर परवडत नसल्यामुळे भविष्यात कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा बंद पडण्याचा धोका आजकाल स्पष्टपणे जाणवत आहे. ही विमानसेवा कायमस्वरूपी आणि सर्वसामान्यांनाही परवडणार्‍या दरात सुरू ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

विमान प्रवासाचे तुलनात्मक सरासरी दर!

मुंबई ते दिल्ली 2.15 तास 6 ते 10 हजार

कोल्हापूर ते मुंबई 40 मिनिटे 17 ते 18 हजार

मुंबई ते दुबई 1.40 तास 8 ते 10 हजार

मुंबई ते अंदमान 6.10 तास 9 ते 12 हजार

मुंबई ते सिंधुदुर्ग 35 मिनिटे 2 ते 3 हजार

मुंबई ते व्हिएतनाम 4.00 तास 14 ते 16 हजार

मुंबई ते जळगाव 1.00 तास 2 ते 2.5 हजार

बंगळूर ते कोलकाता 2.39 तास 6 ते 11 हजार

चेन्नई ते कोलकाता 2.15 तास 6 ते 10 हजार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT