कोल्हापूर : संभाजीनगर बस स्थानकातील वाहक संतोष सीताराम कुंभार (वय ४२, रा. सडोली खालसा, ता. करवीर) यांचा बुधवारी (दि. २६) दुपारी मृत्यू झाला. धाप लागून प्रकृती अत्यवस्थ बनल्याने अंबाई टँक परिसरातील रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गोंधळ घातला. गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले.
संभाजीनगर बसस्थानकातील वाहक संतोष कुंभार यांना बुधवारी सकाळी डेपोत काम करत असताना अत्यवस्थ वाटू लागले. त्यांना अंबाई टॅंक परिसरातील रुग्णालयात दाखल केले. दुपारी त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईक, मित्रांनी कुंभार यांच्यावर उपचारामध्ये हलगर्जीपणा झाला असून, वॉर्डमध्ये नेताना रुग्ण सर्वांशी बोलत होता. मग अचानक मृत्यू कसा झाला? असा आरोप केला. ज्युनिअर्स डॉक्टरांकडूनच तपासणी, उपचार केले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जुना राजवाडा पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढली. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, यानंतर कारवाईचे आश्वासन दिले.