आमदार राजेश क्षीरसागर Pudhari Photo
कोल्हापूर

Rajesh Kshirsagar : मंत्रिपदाची संधी मिळेल अशी अपेक्षा

आ. राजेश क्षीरसागर; लवकरच मंत्रिमंडळात बदलाचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्याकडे आमदार म्हणून नाही तर मंत्री म्हणूनच पाहतात. पक्ष नेतृत्वाने मंत्र्यांच्या बदलाचे संकेत दिले आहेत. अडीच वर्षांनंतर मंत्रिमंडळात बदल होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सर्वात सीनिअर असल्याने पक्षासाठी सातत्याने लढणारा कार्यकर्ता म्हणून मंत्री आणि कोल्हापूर पालकमंत्रिपदाची संधी मिळेल, अशी अपेक्षा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी रविवारी (दि. २२) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

आ. क्षीरसागर म्हणाले, गेली चाळीस वर्षे पक्षासाठी तळमळीने काम करत आहे. पक्षाचा एकनिष्ठ असल्याने कुणाशीही कॉम्प्रमाईज न करता पक्षवाढीसाठी काम करणारा आणि लढणारा मी आहे. सोशल मीडियावरून केल्या जाणाऱ्या चुकीच्या बदनामीला न भिता पक्षासाठी काम करत आहे. कधीही कुणाबरोबरही तडजाेड केली नाही. जनता हेच माझे कोर्ट आहे. विकासकामे आणि जनतेची कामे करत असल्यानेच कोल्हापूरकरांनी मला तिसऱ्यांदा आमदार केले. पक्ष नेतृत्वालाही संपूर्ण राज्य सांभाळावे लागते. काहींना शब्द दिल्याने मंत्रिपदाची संधी मिळाली.

गोकुळ निवडणुकीत सामंजस्याची भूमिका घेतली असती तर...

गोकुळ निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील नेत्यांची मुंबईत बैठक झाली. त्या बैठकीत मी जिल्ह्यातील मंत्री व नेत्यांना महायुती म्हणून सामंजस्याची भूमिका घेण्याचे आ‍वाहन केले होते. कारण कोल्हापुरात शिवसेनेची ताकद असूनही फक्त महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकण्यासाठी आम्ही दोन पावले मागे आलो. अन्यथा निवडणूक जागावाटपात अडून बसलाे असतो तर महायुतीची सत्ता आली नसती. त्याच पद्धतीने गोकुळ निवडणुकीत सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेतली असती तर निर्विवाद सत्ता आली असती, असेही आ. क्षीरसागर म्हणाले.

महापौर कालावधी १० महिनेच...

महायुतीची सत्ता आल्यानंतर सुरुवातीलाच सर्वानुमते प्रत्येकी १० महिन्यांचा महापौर असा कालावधी ठरला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर किमान सव्वा वर्षे कालावधी असावा, असे ठरल्याचे सांगण्यात येत आहे. पण कोल्हापूरच्या राजकारणात जे ठरले ते केले तर कटुता येत नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दहा महिन्यांचाच महापौर असावा हे पटवून देऊ, असेही आ. क्षीरसागर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT