इचलकरंजी : एक लाख रुपयांच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला व वडिलांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी स्वप्निल सुनील परीट (रा. जवाहरनगर), आयुब अहमद अत्तार (रा. केटकाळेनगर) व अथर्व विजयकुमार कुलकर्णी (रा. शिक्षक कॉलनी, जवाहरनगर) या संशयितांना अटक केली. तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, तर दोघे जर्मनी गँगचे आहेत. याची फिर्याद रियाज सिकंदर नाईकवाडे (रा. अष्टविनायकनगर) यांनी दिली आहे.
फिर्यादी अत्तार यांचा टेम्पो ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांचा अल्पवयीन मुलगा २८ जुलै रोजी दुपारी २ वाजता गॅरेजमध्ये निघाला होता. यावेळी संजय फौंड्रीजवळ स्वप्निल परीट, आयुब अत्तार व अथर्व कुलकर्णी यांनी मोटारसायकलवरून येऊन त्याला अडवले व त्याला जबरदस्तीने मोटार सायकलवरून स्वामी अपार्टमेंट परिसरात आणले. तिथे १ लाख रुपये तुझ्या वडिलांनी दिले नाहीत, तर तुला आणि वडिलांना ठार मारणार, अशी धमकी देत खंडणी मागितली. तसेच, मुलाला मारहाण करून मोबाईल हिसकावून घेतला.
तिघाही संशयितांची यावेळी वादावादी सुरू असल्याने तिथून अल्पवयीन मुलाने पळ काढला. दरम्यान, ८ जुलै रोजीही स्वप्निल परीट या संशयिताने दारूचे बिल भागवण्यासाठी फिर्यादी नाईकवाडे यांना अडवून १० हजारांची मागणी करीत मारहाण केली होती, असे फिर्यादीत नमूद केले आहे. अटक केलेल्या तिघाही संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.