सव्वा वर्षात 358 जणांनी संपविली जीवनयात्रा 
कोल्हापूर

Kolhapur News : क्षणभराचे नैराश्य अन्‌‍ आयुष्याचा शेवट

करवीर, कागल तालुक्यात जीवनयात्रा संपविण्याचे सत्र; सव्वा वर्षात 358 जणांनी संपविली जीवनयात्रा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : नैराश्य, प्रेमभंग, आर्थिक समस्या, बेरोजगारी आणि कौटुंबिक कलहासह अन्य वैयक्तिक कारणांमुळे व्यथित होऊन मृत्यूला कवटाळण्याच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात झालेली वाढ ही सामाजिकदृष्ट्या अत्यंत चिंतेची बाब आहे. प्रगत आणि सधन परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर आणि कागल तालुक्यातील ग्रामीण भागात जानेवारी 2025 ते मार्च 2026 या कालावधीत तब्बल 358 जणांनी आत्महत्या करून आपल्या जीवनाचा प्रवास अर्ध्यावरच संपविला आहे.

यामध्ये तरुणाईसह महिलांची संख्याही धक्कादायक आहे. आत्महत्या केलेल्यांमध्ये करवीर तालुक्यातील 289, तर कागल तालुक्यातील 69 जणांचा समावेश आहे. जानेवारी ते डिसेंबर 2025 या काळात सर्वाधिक आत्महत्या करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्या आहेत. यामध्ये गळफास घेऊन 112 जणांनी आपली जीवनयात्रा संपविली असून, त्यात 22 महिलांचा समावेश आहे. तसेच कीटकनाशक प्राशन करून मृत्यूला कवटाळलेल्या 66 व्यक्तींमध्ये 10 महिलांचा समावेश आहे.

आत्महत्या केलेल्यांमध्ये वयोगटानुसार प्रमाण पाहिले असता, 17 ते 22 वयोगटात हे प्रमाण 15 टक्के आहे. 22 ते 30 वयोगटात 25 टक्के, 30 ते 35 वयोगटात 35 टक्के, तर 35 ते 50 वयोगटात 25 टक्के प्रमाण दिसून येत आहे. विशेषतः 17 ते 22 या कोवळ्या वयोगटात घडणाऱ्या आत्महत्येच्या घटना समाजाची चिंता वाढवणाऱ्या आहेत. प्रेमभंग, बेरोजगारी, आर्थिक चणचण तसेच व्यसनाधीनतेमुळे ऐन उमेदीच्या काळातील तरुण मुले नैराश्यातून गळफास किंवा विष प्राशन करून मृत्यूला जवळ करत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.

पोलिस ठाणेनिहाय आत्महत्या केलेल्यांची आकडेवारी (कंसात महिलांची संख्या)

कागल 23 (5) मुरगूड 20 (1)

गांधीनगर 14 (5) शिरोली 17 (3)

गोकुळ शिरगाव 15 (3) इस्पुर्ली 9 (5)

जानेवारी ते मार्च 2026 या केवळ तीन महिन्यांच्या काळात गळफास आणि कीटकनाशक प्राशन करून 51 जणांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे, ज्यात 15 महिलांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT