योगेश कुलकर्णी  
कोल्हापूर

Kolhapur | आनंदाच्या क्षणी काळाचा घाला; सुखी संसाराचा खेळ विस्कटला!

कोल्हापुरातील मेडिकल व्यावसायिकाचा हृदयविकाराने मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : नव्या संसाराची स्वप्ने पाहणारा आणि आपल्या चिमुकलीच्या आगमनाने आनंदात असलेल्या 27 वर्षीय तरुणावर काळाने झडप घातली. राजारामपुरी येथील औषध व्यावसायिक योगेश कुलकर्णी यांचा अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला अचानक मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, ज्या दिवशी पत्नीचा वाढदिवस आणि लाडक्या कन्येला दोन महिने पूर्ण होणार होते, त्याच दिवशी योगेशवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ओढवली. योगेशने अक्षय तृतीयेच्या दिवशी पत्नी आणि मुलीला विशेष सरप्राईज देण्याचे नियोजन केले होते. शुक्रवारी त्याने आई आणि बहिणीसोबत सणाचे साहित्य खरेदी केले. त्यांना घरी सोडून तो राजारामपुरी येथील आपल्या मेडिकल स्टोअरवर गेला. मात्र, तेथे अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले.

मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारांपूर्वीच अवघ्या पंधरा मिनिटांत त्याची प्राणज्योत मालवली. दोन वर्षांपूर्वीच योगेशचा विवाह झाला होता. दोन महिन्यांपूर्वीच त्याला कन्यारत्न प्राप्त झाल्याने कुलकर्णी कुटुंबात उत्साहाचे वातावरण होते. मात्र, एका क्षणात सर्व आनंद नियतीने हिरावून नेला. योगेशच्या अकाली निधनामुळे त्याची पत्नी श्रद्धा, आई-वडील आणि बहीण यांच्यासह मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जीवनाच्या अनिश्चिततेचे दाहक वास्तव मांडणारी ही घटना संपूर्ण कोल्हापूरकरांच्या मनाला चटका लावून गेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT