कोल्हापूर : संघटित गुन्हेगारांसह अमली तस्कर आणि काळे धंदेवाल्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी आक्रमक पावले उचलली आहेत. गणेशोत्सवापूर्वी कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्ह्यातील 5 अट्टल टोळ्यांमधील 15 गुन्हेगारांवर ‘मोका’ कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे दाखल करण्यात आला आहे. चार टोळ्यांतील 20 सराईत गुंड कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांतून तडीपारीच्या रडारवर आहेत. गणेशोत्सवापूर्वी कोणत्याही क्षणी कारवाईचा बडगा शक्य असल्याचे मंगळवारी सांगण्यात आले.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अमली तस्कर आणि संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या दहशतीविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी प्रभारी अधिकार्यांना दिले आहेत. त्यानुसार गंभीर कारनाम्यांचे रेकॉर्ड असलेल्या शहर व जिल्ह्यातील डझनभर टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायदा व तडिपारीचे प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांच्याकडे दाखल झाले आहेत. प्रभारी अधिकारी व विधी अधिकार्यांच्या सल्ल्यानुसार गणेशोत्सवापूर्वी नऊ संघटित टोळ्यांतील 35 गुंडांवर ‘मोका’ व दोन जिल्ह्यांतून तडीपार कारवाई शक्य असल्याचे वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.
पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी अमली तस्कर, मटका, तीन पानी जुगार, कॅसिनो अड्ड्याविरुद्ध विशेष कारवाईची मोहीम राबविण्याचे आदेश पोलिस ठाण्यांतर्गत सर्व प्रभारी अधिकार्यांना दिले होते. पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानंतरही कोल्हापूर शहर, इचलकरंजीसह शहापूर, शिरोळ, कुरुंदवाड, जयसिंगपूर, वडगाव, कागल, मुरगूड, चंदगड, गडहिंग्लज परिसरात मटका, जुगार अड्डे सुरू असल्याचे पोलिस हेल्पलाईनवरील गोपनीय माहितीचे निष्कर्ष आहेत. या घटनेची पोलिस अधीक्षकांनी दखल घेतली आहे.