रूपाराणी निकम  Pudhari
कोल्हापूर

Rooparani Nikam : ...तर महापौरपदाचा राजीनामा देईन!

जनता दरबारात महापौर निकम यांचा रुद्रावतार

पुढारी वृत्तसेवा

​कोल्हापूर : महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित महापौर जनता दरबारात मंगळवारी (दि. ११) जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. भाषणाच्या सुरुवातीला ‘जय श्रीराम’ म्हणण्यावरून आक्षेप घेणाऱ्या ॲड. शेखर सनदे यांना महापौर रूपाराणी निकम यांनी अत्यंत आक्रमक आणि सडेतोड उत्तर देत चांगलाच समाचार घेतला. ‘माझे विधान खोटे ठरल्यास मी महापौरपदाचा राजीनामा देईन,’ अशा शब्दांत महापौरांनी तक्रारदाराला खडसावले.

ॲड. सनदे यांनी आपली मूळ तक्रार मांडण्यापूर्वी, ‘संविधानिक पदावर असताना भाषणात ‘जय श्रीराम’ कसे म्हणू शकता?’ असा सवाल उपस्थित करत केवळ महापुरुषांची नावे घेणे अपेक्षित असल्याचा दावा केला. यावर महापौर निकम यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. त्या म्हणाल्या, ‘अपुर्‍या माहितीच्या आधारे बोलू नका. संविधानाने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. मी सर्व धर्मांचा आदर करते. ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी असून, येथे जातिपातीला थारा नाही. मी माझ्या प्रत्येक भाषणाची सुरुवात सर्व महापुरुषांचे स्मरण करूनच करते. हे माझी जुनी भाषणे पाहून तपासावे.’

​महापौर निकम यांनी संविधानातील कलमांचे दाखले देत सनदे यांना चांगलेच सुनावले. महापौरांचा आक्रमक पवित्रा पाहून तक्रारदाराने अखेर माघार घेत माझ्या सांगण्याचा वेगळा अर्थ काढू नका, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. या वाक्‌युद्धानंतर त्यांनी महापालिकेच्या लेबर कंत्राटदारांच्या निविदेत १० कोटींच्या अटीबाबतची मूळ तक्रार मांडली. मात्र, या राजकीय व कायदेशीर वाक्‌युद्धाची चर्चा दिवसभर महापालिका वर्तुळात रंगली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT