Kolhapur mayor  Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur mayor reservation: महापौरपदासाठी उद्या मुंबईत आरक्षण सोडत

इच्छुकांच्या नजरा सोडतीकडे : राजकीय वातावरण तापणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर, इचलकरंजीसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत गुरुवारी (दि. 22 जानेवारी) मुंबई येथे होणार आहे. या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्ष, नेते आणि इच्छुक नगरसेवकांच्या नजरा लागून राहिल्या असून सोडतीनंतर राज्यभरात राजकीय हालचालींना वेग येणार आहे. अनेक महापालिकांमध्ये शह-काटशहाचे राजकारण रंगण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

राज्यातील महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी पार पडल्या, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर झाला. त्यानंतर लगेचच महापौरपदासाठीच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. यंदा पहिल्यांदाच एकाचवेळी राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. नगरविकास मंत्रालय, मुंबई येथील सहाव्या मजल्यावर सकाळी 11 वाजता ही सोडतीस प्रारंभ होणार आहे. या सोडतीत कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण निघणार, हे स्पष्ट होणार असून त्यानंतर महापौर निवडीचे राजकारण अधिकच तापणार आहे.

कोल्हापूर महापालिकेत काँग््रेास पक्ष सर्वाधिक जागांसह आघाडीवर असून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांची एक जागा मिळून महाविकास आघाडीची एकूण संख्या 35 झाली आहे. दुसरीकडे महायुतीकडे एकूण 45 जागा असून त्यामध्ये भाजपच्या 26, शिवसेना (शिंदे गट) 15 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग््रेासच्या 4 जागांचा समावेश आहे. त्यामुळे सद्यस्थितीत महापौरपदावर महायुतीचाच दावा मजबूत असल्याचे चित्र आहे.

मात्र, राज्यभरात सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोडी, गटबाजी आणि सत्तासमीकरणांमुळे अनेक ठिकाणी अनपेक्षित राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही महापालिकांमध्ये महायुतीतील तर काही ठिकाणी महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्षातून विरोधकांशी हातमिळवणीचे प्रकार घडताना दिसत आहेत. त्यामुळे महापौर निवडणूक केवळ संख्याबळावर न ठरता राजकीय डावपेचांवर अवलंबून राहणार असल्याचे संकेत आहेत.

कोल्हापूर महापालिकेतही राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी सावध भूमिका घेतली असून आरक्षण सोडतीनंतरच आपली पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. गुरुवारी होणाऱ्या सोडतीनंतर चित्र अधिक स्पष्ट होणार असून त्यानंतर महापौरपदासाठी इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT