कोल्हापूर : कोल्हापूर, इचलकरंजीसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर महापालिका निवडणुका एकत्र झाल्या. पण महापौरपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही. लवकरच मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यामध्ये आरक्षण जाहीर करण्याच्या तारखेवर निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र आरक्षण सोडत जाहीर होण्याआधीच कोल्हापूर महापालिकेत महापौरपदासाठी राजकीय ‘जोडण्या’ सुरू झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर झालेल्या या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपला 26, शिवसेनेला 15, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला 4 आणि जनसुराज्यला 1 अशी एकूण 46 जागा महायुतीकडे आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला 34 जागांवर समाधान मानावे लागले, तर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला केवळ 1 जागा मिळाली आहे. त्यामुळे महायुतीचाच महापौर होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
महायुतीत सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून भाजपाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे महापौरपदाची पहिली संधी भाजपलाच मिळावी, असा पक्षांतर्गत आग्रह पुढे येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपसह महायुतीतील इतर घटक पक्षांमधील इच्छुकांनीही आत्तापासूनच हालचाली वाढवल्या असून, राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
दरम्यान, खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर शासनाने मागील दहा वर्षांतील महापौरपदाच्या आरक्षणाची माहिती मागवली होती. त्यामुळे आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून सोडत जाहीर होताच महायुतीतील महापौरपदाची चुरस आणखी तीव— होणार, हे निश्चित मानले जात आहे.
आरक्षण सोडतीकडे लक्ष
कोल्हापूर महापालिकेचे महापौरपद 2010 पासून सलग महिलांसाठी आरक्षित आहे. दोन वर्षे सहा महिन्यांच्या कार्यकाळात मागासवर्गीय महिला, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला अशा प्रवर्गांनुसार आरक्षण लागू करण्यात आले होते. परिणामी गेल्या दहा वर्षांत महिलांनाच महापौरपदाची संधी मिळाली आहे.