कोल्हापूर

कोल्हापूर : वाहतूक समस्येवर मास्टर प्लॅन; वाहतूक शाखेचे नियोजन

दिनेश चोरगे

कोल्हापूर; गौरव डोंगरे :  वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा निघावा, यासाठी पोलिस अधिकार्‍यांनी मास्टर प्लॅन हाती घेतला असून तो आता पोलिस अधीक्षकांकडे पाठविला जाणार आहे. एकेरी मार्गात बदल, गर्दीच्या चौकात जादा पोलिस, बहुमजली पाकिंग असे अनेक बदल करण्याच्या द़ृष्टीने प्रस्ताव बनविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन, महापालिकेकडून अपेक्षित कामे तातडीने पूर्ण करून घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

शहर उपअधीक्षक अजित टिके, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी तातडीने शहरातील गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करून प्रस्ताव बनविण्याचे काम हाती घेतले आहे. जादाचे सिग्नल, सायंकाळी जादा मनुष्यबळ, एकेरी मार्गात बदल याचा अभ्यास करण्यात आला आहे.

जुने वन-वे बदल करणे

शहरातील पारंपरिक एकेरी मार्ग 25 ते 30 वर्षांपासून 'जैसे थे' आहेत. यामध्ये काही एकेरी मार्गांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. परंतु, यानंतरही अनेक एकेरी मार्गांचा योग्य पद्धतीने वापर होतो किंवा नाही हे पाहण्यात येणार आहे. वाहतूक कोंडीत भरच पडत असेल असे एकेरी मार्ग बंद करण्याचाही विचार आहे.

वर्षाकाठी 75 हजार वाहनांची भर

2018 ते 2023 दरम्यानचा सर्व्हे शहर वाहतूक शाखेने विचारात घेतला असून प्रतिवर्षी 75 हजार वाहनांची भर पडत असते. म्हणजे मागील पाच वर्षांत 3 लाख 75 हजार वाहनांची वाढ झाली आहे. शाळा भरणे व सुटण्याच्या वेळेत वर्दळ वाढते. अंबाबाई मंदिर, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, ताराबाई रोड, रंकाळा परिसरात सायंकाळी पाचनंतर गर्दी होते. रात्री 8 नंतर नोकरदार यांचे मार्गही निश्चित आहेत. गर्दीच्या ठिकाणी जादा वाहतूक पोलिस, होमगार्ड पुरविणार येणार आहेत. काही पोलिसांना रात्री जबाबदारी देण्याचाही विचार आहे.

बेवारस वाहनांची अडगळ

शहरातील अनेक मार्गांवर बेवारस, नादुरुस्त वाहने वर्षानुवर्षे पडून आहेत. यापूर्वीही वाहतूक शाखेने अशा वाहनांना नोटीस चिकटविण्याचे काम केले होते; पण संबंधितांनी वाहने जाग्यावरून हटवलेली नाहीत. अशावेळी ही बेवारस वाहने जप्तीची कारवाई पोलिस आणि महानगरपालिका करणार का, हे पाहावे लागेल.

शहरातील सध्याची पार्किंगची ठिकाणे अपुरी पडत आहेत. अंबाबाई मंदिरासह रंकाळा, न्यू पॅलेस अशा ठिकाणी पर्यटकांची संख्या मोठी आहे. काही खासगी पार्किंगचाही सध्या शोध सुरू आहे. यासोबतच बहुमजली पार्किंगसाठीचे प्रस्तावही पोलिस प्रशासनाकडून महानगरपालिकेला सादर करण्यात येणार आहेत.
– नंदकुमार मोरे, वाहतूक पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT