Kolhapur Dussehra Markets| दसऱ्यासाठी कोल्हापूरची बाजारपेठ सज्ज 
कोल्हापूर

Kolhapur Dussehra Markets| दसऱ्यासाठी कोल्हापूरची बाजारपेठ सज्ज

सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन बाजारात कोट्यवधींची उलाढाल अपेक्षित

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठ सज्ज झाली असून, ग्राहकांच्या उत्साहाने बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. सराफ कट्टा, राजारामपुरी, महाद्वार रोड, लक्ष्मी रोड आणि शाहूपुरी परिसरातील दुकाने ग्राहकांनी गजबजली आहेत. यंदा ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि सोने-चांदीच्या बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सराफ बाजारात पारंपरिक दागिन्यांना पसंती

गुजरी आणि सराफ बाजारात दोन दिवसांपासून आगाऊ नोंदणीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सोने-चांदीच्या दरात चढ-उतार असले तरी मुहूर्ताच्या खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह कायम आहे. पारंपरिक कोल्हापुरी साज, ठुशी, बोरमाळ, मोहनमाळ यांसारख्या दागिन्यांसह सोन्या-चांदीच्या नाण्यांना सर्वाधिक मागणी आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ज्वेलर्सनी मजुरीवर विशेष सवलती आणि आकर्षक भेटवस्तूंच्या योजना जाहीर केल्या आहेत.

वाहन बाजारात विक्रमी बुकिंग

दसऱ्याच्या दिवशी नवी गाडी घरी नेण्याचा ट्रेंड यंदाही कायम आहे. दुचाकी व चारचाकी शोरूम्समध्ये मिळून शेकडो वाहनांची आगाऊ नोंदणी झाली आहे. पेट्रोल-डिझेल वाहनांइतकीच इलेक्ट्रिक दुचाकी आणि ई-कार्सना ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आहे. अनेक शोरूम्समध्ये कागदपत्रांची पूर्तता आधीच पूर्ण करून मुहूर्तावर थेट गाडीची डिलिव्हरी देण्याची लगबग सुरू आहे.

इलेक्ट्रॉनिक्समध्‍ये ऑफरचा पाऊस

घरासाठी आवश्यक टीव्ही, वॉशिंग मशिन, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह आणि लॅपटॉप्सवर विविध ब्रँडस्‌नी ‘कॅशबॅक’, ‘झिरो डाऊन पेमेंट’ आणि सुलभ हप्त्यांच्या योजना आणल्या आहेत. ५५ इंच व त्याहून मोठ्या स्मार्ट टीव्हीसाठी विशेष मागणी दिसून येत आहे. मोबाईल हँडसेटस्‌च्या दालनांमध्येही तरुणाईची लक्षणीय गर्दी आहे.

पूजेचे साहित्य, झेंडूची फुले, आपट्याची पाने, तोरणे आणि फराळाच्या साहित्यानेही मंडई परिसर गजबजून गेला आहे. एकंदरीत आर्थिक मंदीचे सावट बाजूला सारत कोल्हापूरच्या बाजारपेठेत दसऱ्यानिमित्त नवा चैतन्यमय उत्साह पाहायला मिळत आहे.

शाही दसरा सोहळा आज

कोल्हापूर : नवरात्रौत्सवाची सांगता मंगळवारी (दि. २०) विजयादशमीने होणार आहे. यानिमित्ताने दसरा चौकात करवीर छत्रपतींच्‍या शाही दसरा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सूर्यास्तावेळी सायंकाळी ६ वाजून ६ मिनिटांनी पारंपरिक शमीपूजनाचा समारंभ होईल. खासदार शाहू महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे व यशराजराजे यांच्या हस्ते लकडकोटावरील शमीपूजन होईल. यानंतर सोने लुटण्याचा सोहळा होणार आहे. तत्पूर्वी रयतेच्या स्वराज्याच्या ध्वजास मानवंदना दिली जाणार आहे. दरम्यान, दसरा चौकात शाही दसरा सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दसरा सोहळ्यास मान्यवरांसह नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दसरा महोत्सव समिती नवीन राजवाडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT