कोल्हापूर : विविध प्रकारच्या माळा खरेदीसाठी गर्दी झाली होती.  (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

Ganpati Shopping | बाप्पा येणार घरी, खरेदीची लगबग भारी!

रविवारची सुट्टी, नोकरदारांच्या हातात पगार आल्यामुळे बाजारपेठ गजबजली

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : लाडक्या बाप्पांच्या आगमनाला आता अवघे आठ दिवस उरले आहेत. येत्या सोमवारी गणरायाचे घराघरांत आगमन होणार आहे. त्यामुळे बाप्पांच्या स्वागतासाठी घराची आरास आणि सजावटीचे तसेच प्रसादाचे साहित्य खरेदी करण्यासाठी रविवारी कोल्हापूरच्या बाजारपेठांमध्ये उत्साहाला भरती आली. रविवारची सुट्टी आणि महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नोकरदारांच्या हातात आलेला पगार यामुळे सहकुटुंब खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली होती.

बाजार गेट, महापालिका परिसर, पापाची तिकटी, ताराबाई रोड, महाद्वार रोड, लक्ष्मी रोड, राजारामपुरी, कसबा बावडा यासह गांधीनगर मार्केटमध्ये गणेशोत्सवाचा माहोल पाहायला मिळाला. दुकानांसमोर रंगीबेरंगी मखर, पडदे, तोरणे, फुलांच्या माळा, कृत्रिम वेली आणि विविध सजावटीचे साहित्य मांडण्यात आले होते.

मखर, बॅकग्राऊंड, पीव्हीसी व ॲक्रेलिक सजावट, रेडिमेड पडदे, रांगोळी, फुलांच्या माळा, मोरपिसे, सजावटीच्या वेली आणि कृत्रिम फुलांची खरेदी करण्याकडे कल असल्याचे दिसून आले. विद्युत रोषणाईसाठी एलईडी, कर्टन लाईट, स्ट्रिंग लाईट, आरजीबी लाईट, फेरी लाईटसह विविध प्रकारचे दिवे खरेदी केले जात होते. पूजेसाठी चौरंग, पाट, समई, निरांजन, लामणदिवे, तांब्या-पंचपात्र, घंटा, आरतीची ताटे आणि पूजेच्या तबकांची खरेदी सुरू होती.

किराणा खरेदीलाही गर्दी

बाप्पांच्या आरास-सजावटीसोबतच प्रसाद आणि नैवेद्यासाठी लागणाऱ्या किराणा साहित्याच्या खरेदीलाही रविवारी मोठी गर्दी झाली. मोदक, लाडू, शिरा, पुरणपोळी यांसह विविध पदार्थांसाठी लागणारा रवा, साखर, गूळ, खोबरे, तूप, बेसन, डाळी, तांदूळ, सुकामेवा, वेलची, काजू-बदाम आदी साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहक किराणा दुकानांकडे वळले. त्यामुळे सजावटीच्या दुकानांबरोबरच किराणा बाजारातही गणेशोत्सवाच्या तयारीचा माहोल होता.

गणरायाच्या स्वागतासाठी खरेदीची यादी

आकर्षक मखर व बॅकग्राऊंड

पडदे, तोरणे, फुलांच्या माळा

एलईडी, कर्टन, स्ट्रिंग व आरजीबी लाईट

चौरंग, पाट, समई, निरांजन

पूजेची ताटे, घंटा, तांब्या-पंचपात्र

रांगोळी, सजावटीच्या वेली व कृत्रिम फुले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT