Hapus Mango 
कोल्हापूर

Kolhapur News : आवक वाढली; आंब्याचे दर आवाक्यात

बाजार समितीत कर्नाटक, केरळ, तामिळनाडूतून सर्वाधिक आवक; 500 ते 1,200 रुपयांपर्यंत पेटीचा दर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू येथून आंबा आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. सध्या क्वालिटीनुसार 500 ते 1,200 रुपये प्रतिडझन असा दर आहे. 15 ते 20 मेपर्यंत आंब्याची आवक चांगली राहील, असे समितीचे संचालक व आंबा व्यापारी नंदकुमार वळंजू यांनी सांगितले.

कोकणात यंद आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. केवळ 10 ते 20 टक्केच आंबा येथील शेतकऱ्यांच्या हाताला लागला आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात समितीमध्ये आवक अत्यल्प प्रमाणात होती. परिणामी, दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते.

एक्स्पोर्ट क्वालिटीचा आंबा उपलब्ध

इराण-अमेरिका युद्धामुळे हापूस आंब्याचे एक्स्पोर्ट थांबले आहे. हा आंबा स्थानिक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. एका आंब्याचे वजन सुमारे 350 ग््रॉम आहे. तर पेटीचा दर 1,000 ते 1,200 रुपये असा आहे.

परराज्यांतील आंब्याची हापूसच्या नावाखाली विक्री

देवगड, रत्नागिरी हापूस आंब्याच्या बॉक्समधून परराज्यांतील आंबा समितीमध्ये येत आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू येथील आंबा हापूसच्या नावाखाली विक्री केला जात आहे. पॅकिंगसाठी सुमारे दहा हजार बॉक्स या राज्यांमध्ये जात आहेत. 250 ते 500 रुपये पेटी या दराने परराज्यांतील आंब्याची हापूसच्या नावाखाली विक्री सुरू आहे.

आंब्याचे बाजारपेठेतील दर असे

देवगड, रत्नागिरी हापूस : 600 ते 1,200

एक्स्पोर्ट क्वालिटी आंबा : 1,000 ते 1,200

पायरी : 200 ते 500

कर्नाटक : 200 ते 400

केरळ : 350 ते 600

तामिळनाडू : 200 ते 400

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT