कोल्हापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयानिमित्त विविध क्षेत्रांत खरेदीची सुमारे 400 ते 500 कोटींहून अधिकची उलाढाल झाली. कोल्हापुरातील बाजारपेठेत खरेदीसाठी उत्साह व चैतन्याचे वातावरण दिसून आले.
लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी सोने-चांदी खरेदी केली. चोख सोने व हिऱ्यांचे दागिने घेण्याकडे अनेकांचा कल होता. दागिन्यांसोबतच सोन्याच्या नाण्यांचीही खरेदी झाली. यंदा सोन्याच्या दरात वाढ असूनही खरेदीचा उत्साह होता. दुचाकी व चारचाकी शोरूममध्ये ग््रााहकांनी शुभ मुहूर्त साधत नवीन वाहनांची डिलिव्हरी घेतली. इलेक्ट्रॉनिक्स वाहनांची खरेदी जोरात झाली. तीव उन्हाळा व ऑफर्सची बरसात यामुळे इलेक्ट्रॉनिक्स बाजारात टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन खरेदीला चांगला प्रतिसाद दिसून आला. बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रात काही ठिकाणी नवीन घरांच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी नव्या घरात प्रवेश केला. कापड व रेडिमेड वस्त्र बाजारात महिलांनी साड्या, ड्रेस मटेरियल आणि पारंपरिक पोशाखांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली.