कोल्हापूर : मार्केट यार्डमध्ये जाणार्या मुख्य रस्त्यावर एका भाजी विक्रेत्याला लिलाव काढण्यास परवानगी देण्यावरून मंगळवारी दिवसभर गोंधळ सुरू होता. बाजार समितीने रस्ता विकल्याचा आरोप भाजीपाला असोसिएशनच्या सदस्यांनी केला; मात्र त्याचा बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांनी इन्कार करत, समितीची कोणतीही जागा विकता येत नाही. संबंधित व्यापार्याला फक्त रस्त्याकडेला लिलाव काढण्यास परवानगी दिली असल्याचे सांगितले.
भाजी मार्केटमधील मुख्य रस्त्याच्या कडेला वडगाव बाजार समितीच्या हद्दीतील एका भाजी व्यापार्याला जागा देण्यासाठी सभापती पाटील प्रयत्न करत असल्याची माहिती भाजीपाला असोसिएशनला मिळाली. यामुळे वाहतुकीला अडथळा होणार असल्याचे सांगून त्याला भाजीपाला असोसिएशन तसेच वाहतूकदारांनीही विरोध करण्यास सुरुवात केली. यावरून गेले दोन दिवस बाजार समितीमध्ये धुसफूस सुरू आहे. बाजार समितीने ही जागा संबंधित व्यापार्याला देण्यासाठी याठिकाणी बरिकेटस् घालण्यास सुरुवात केल्यानंतर वातावरण चिघळू लागले.
दरम्यान, मंगळवारी सकाळी 11 वाजता भाजीपाला व्यापारी असोसिएशनची बैठक झाली. यात जागा देण्यास विरोध करण्याचे ठरले. यावेळी बाजार समितीचे संचालक नंदकुमार वळंजू, कुमार आहुजा, बाबुराव लाड, भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष रहिम बागवान, उपाध्यक्ष संताजी जाधव, गणी आजरेकर आदी उपस्थित होते. दुपारी 1 वाजता शिष्टमंडळाने सभापती सूर्यकांत पाटील यांची बाजार समितीमध्ये भेट घेतली. यावेळी सचिव तानाजी दळवी होते. जवळपास तीन तास चर्चा सुरू होती. परंतू भाजीपाला असोसिएशनच्या शिष्टमंडळाची मागणी धुडकावून लावत जागा देण्यावर सभापती पाटील ठाम राहिले. त्यामुळे हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
बाजार समितीच्या निरीक्षक कार्यालयात संबंधित व्यापार्याला गाळा देण्यात आला आहे. परंतु फक्त भाजीच्या लिलावासाठी त्याला मुख्य रस्त्याकडेला परवानगी दिली आहे. यामुळे शेतकर्याच्या मालाला चांगला भाव मिळणार असून बाजार समितीलाही फायदा होणार आहे.सूर्यकांत पाटील, सभापती बाजार समिती, कोल्हापूर