Dog Attack Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Dog Attack : मलतवाडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; दोन विद्यार्थिनी, शिक्षक जखमी

दोन जनावरांसह पाच पाळीव कुत्र्यांवरही हल्ला; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

चंदगड : मलतवाडी (ता. चंदगड) येथे रविवारी (दि. १८) सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन विद्यार्थिनी आणि एका निवृत्त शिक्षकासह दोन पाळीव जनावरे व गावातील पाच पाळीव कुत्रे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे मलतवाडी आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या हल्ल्यात मनाली संदीप पाटील (वय १५) आणि समृद्धी मारुती ओऊळकर (वय १६) या दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या. त्यांच्यावर नेसरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर या कुत्र्याने निवृत्त शिक्षक जे. एन. पाटील (वय ६६) यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर गडहिंग्लज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या पिसाळलेल्या कुत्र्याने दोन पाळीव जनावरांसह गावातील पाच पाळीव कुत्र्यांवरही हल्ला करून त्यांना जखमी केले. सकाळच्या सत्रात घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. नागरिकांनी विशेषतः लहान मुले आणि विद्यार्थ्यांनी सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. सदर कुत्रा सांबरे गावातून आल्याचे सांगण्यात येत आहे. काळ्या रंगाचा, सडपातळ बांध्याचा आणि गळ्यात घुंगरू असलेला हा कुत्रा दिसल्यास नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT