कोल्हापूर : चालकाचा ताबा सुटलेली आलिशान मोटार पोलिस अधीक्षक बंगल्यासमोरील चौकात सिमेंटच्या दुभाजकावर जोरात आदळून चौकात उलटली. सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेत दोन मोटारींचे नुकसान झाले. शाहूपुरी पोलिस आणि शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन्हीही वाहने त्वरित हलविल्याने महावीर कॉलेज-कसबा बावडा मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
रविवारी दुपारी तीनच्या सुमारास महावीर कॉलेजच्या दिशेने जाणारी भरधाव मोटार पोलिस अधीक्षक कार्यालय चौकातील दुभाजक असलेल्या सिमेंटच्या कठड्यावर जोरात धडकली व सहा ते सात फूट अंतर मागे जात रस्त्यावरच उलटली. याच वेळी कोल्हापूरहून कसबा बावड्याकडे जाणारी दुसरी मोटार रस्त्यावर कोसळलेल्या सिमेंट दुभाजकाला जोरात धडकली. त्यात या मोटारीचेही नुकसान झाले. रस्त्यावर उलटलेल्या मोटारीतील चालकाला तातडीने बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही.