कोल्हापूर : थर्टी फस्ट आणि नववर्षाचे स्वागत याचे औचित्य साधून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात मटण, चिकन खरेदी करण्यासाठी मटण दुकानांवर ग्राहकांची मोठी गर्दी होती. तसेच कोल्हापूर शहर आणि परिसरात मासे खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत होता. दिवसभरात 30 हजारांवर कोंबड्या, 700 बकरी व 6 टन मासे विक्री झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
थर्टी फर्स्टच्या निमित्ताने गेल्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत असा संयुक्त उत्सव साजरा केला जातो. यापूर्वी हा उत्सव फार कमी प्रमाणात साजरा केला जात असे, तर काही ठिकाणी गोडधोड पदार्थ खाऊन करून नवीन वर्षाचे स्वागत केले जात असे. थर्टी फस्ट आणि मांसाहार हे समीकरण आता चांगलेच दृढ झाले आहे. चिकन, मटण, मासे, अंडी याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. थर्टी फर्स्ट त्यातच मंगळवार यामुळे अनेक कुटुंबात मांसाहार केला जातो. त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत आणि गेल्या वर्षाला निरोप देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी अनेकांनी मटणाच्या जेवणाचा बेत ठरविला होता. त्यामुळे मटण, चिकन खरेदी करण्यासाठी शहरातील मटण दुकानांवर सकाळपासून ग्राहकांची गर्दी होती. दुपारी ही गर्दी कमी झाली; पण दुपारी चारनंतर मात्र ही गर्दी वाढतच गेली. अनेक मटण दुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. उपनगरांतील अनेक मटण दुकानांसमोर रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची गर्दी होती. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार दिवसभरात 30 हजारांहून अधिक कोंबड्या, 700 बकरी, 6 टन मासे आणि 20 हजारांवर अंड्यांची विक्री झाली. काही दुकानांमध्ये बकरी नसल्याने ग्राहकांना परत जावे लागले.