मुंबई : खुनाच्या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्याप्रकरणी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  
कोल्हापूर

kolhapur | कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणचा पोलिस महासंचालकांकडून सत्कार

चंदगड येथील महिला खूनप्रकरण : पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पथकाचा गौरव

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोदाळी (ता. चंदगड) येथे महिलेच्या खुनाचा शिताफीने तपास करून उलगडा केल्याप्रकरणी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास सर्वोत्कृष्ट गुन्ह्याची उकल पुरस्कार प्रदान करण्यात आला. शुक्रवारी मुंबई येथे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलिस अमलदार प्रवीण पाटील यांचा सन्मान केला. रोख रक्कम व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

राज्यामध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासाकरिता उत्कृष्ट अपराध सिद्धी, सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत व गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्नांसाठी पोलिस महासंचालकांच्या वतीने प्रत्येक महिन्यास राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून गुन्ह्याची निवड केली जाते. सप्टेंबर २०२६ या महिन्यात ‘सर्वोत्कृष्ट गुन्ह्याची उकल’ यासाठी चंदगड येथील महिला खून प्रकरणाची निवड केली. पोलिस महासंचालकांनी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचेही विशेष कौतुक केले.

२९ मे रोजी कोदाळी ते दोडामार्ग रस्त्यावर तिलारी प्रेशर पॉईंटनजीक कच्च्या रोडच्या बाजूस एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. पाईपने मारहाण करून खून केल्याचे निष्पन्न झाले. महिलेची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पथकासमोर होते. सांगली, सिंधुदुर्ग, कर्नाटक, गोवा येथील बेपत्ता महिलांची माहिती गोळा करून ओळख पटविली. तसेच चंदगड ते हिंडलगा ब्रीज, बेळगाव असा संशयित चारचाकीचा माग काढला. त्यानंतर बेळगाव ते हुबळी असा ११० कि.मी. अंतर मोटारसायकलचा माग काढून, तांत्रिक माहितीच्या आधारे अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या खुनाचा उलगडा केला. या प्रकरणी चार संशयितांना अटक करून, त्यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT