बालिंगा : शिंगणापूर मुख्य मार्गावरील खांडसरी नाका परिसरात शनिवारी (ता.१०) मध्यरात्री सतीश तानाजी पाटील (रा. हणमंतवाडी) या तरुणाला बिबट्याचे दर्शन झाले.
याबाबत प्रत्यक्षदर्शीने दिलेली माहिती अशी : पाटील हे त्यांचे मोठे बंधू हर्षद पाटील यांच्यासोबत ट्रॅक्टरमधून रात्री त्यांच्या घरी हणमंतवाडीकडे परतत होते. खांडसरी नाक्यापासून पुढे गेल्यावर योगेश माने यांच्या ट्रेडर्स गोडावून परिसरात बिबट्याने त्यांच्या ट्रॅक्टरसमोरून ट्रेडर्स गोडावूनच्या पिछाडीस असलेल्या शेतात उडी मारल्याचे प्रत्यक्ष पाहिले. तसेच शिंगणापूर मार्गावरील दत्तनगरमधील काही महिला पहाटे चारच्या सुमारास फिरायला गेल्या असता चंबुखडी टाकी परिसरात बिबट्या दिसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, रविवारी सायंकाळी सहा - सातच्या सुमारास वन विभागाच्या पथकाने चंबुखडी टाकीच्या टेकडीवरून अडीच किलोमीटरच्या परिक्षेत्रात ड्रोनद्वारे बिबट्याच्या शोधासाठी मोहीम राबविली; पण बिबट्या आढळून आला नाही. दरम्यान, मध्यरात्रीनंतर पुन्हा एकदा वन विभागाकडून शोधमोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शोधमोहिमेत पशुपर्यवेक्षक अमित कुंभार, वन्यजीव बचाव पथकचे आशुतोष सूर्यवंशी, राकेश शिखरे, वैभव आवळे यांनी सहभाग घेतला.