कोल्हापूर : ताराबाई पार्क, नागाळा पार्कात धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला तीन तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद करण्यात आले. मात्र हा बिबट्या कुणाचा याची चर्चा सर्वत्र सुरू होती. यापूर्वीही नववर्ष सुरुवातीलाच रुईकर कॉलनीत बिबट्याने असाच धुमाकूळ घातला होता. त्यावेळीही अशी चर्चा होती. मात्र पुढे काहीच झाले नाही. काळ पुढे गेला तशी चर्चाही थांबली.
मंगळवारी कोल्हापुरात बिबट्या आला. त्यापूर्वी काहींच्या म्हणण्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून हा बिबट्या नागाळा पार्क, ताराबाई पार्क, सेंट झेवियर्स हायस्कूल परिसरात वावरत होता, अशी चर्चा आहे. मंगळवारी पहाटे चार वाजता आरटीओ ऑफिस ते एसटी वर्कशॉपचे दत्त मंदिर या परिसरात या बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद झाला. बिबट्याच्या मागे कुत्री लागल्याचे या व्हिडीओत दिसते.
सकाळी बिबट्या या परिसरात दिसल्याची चर्चा मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात होती. मात्र दुपारी पावणेबाराच्या सुमारास ताराबाई पार्कात कर्नल निकम यांचा बंगला, त्या पाठोपाठ हॉटेल वूडलँड आणि महावितरण कार्यालयाची पिछाडी येथे बिबट्या दिसला. त्याला जेरबंद केले. मात्र बिबट्या कुणाचा, ही चर्चा दिवसभर सुरू होती.