कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवातील महत्त्वाचा सोहळा असलेल्या अंबाबाई-त्र्यंबोली देवी भेटीची भाविकांना उत्सुकता लागली आहे. गुरुवारी (दि. १५) ललिता पंचमीनिमित्त करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची पालखी टेंबलाई टेकडीवरील त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी मार्गस्थ होणार आहे. या सोहळ्यात त्र्यंबोली देवीसमोर होणाऱ्या पारंपरिक कुष्मांड भेदनाचा (कोहळा भेदनाचा) मान कुमारी नारायणी अवधूत गुरव हिला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि टेंबलाई मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
ललिता पंचमीला अंबाबाई आपल्या मैत्रिणीला, म्हणजेच त्र्यंबोली देवीला भेटण्यासाठी जाते, अशी परंपरा आहे. यावेळी देवीची मनधरणी करून राक्षसवधाच्या प्रतीकात्मक विधीसाठी कुमारिकेच्या हस्ते कुष्मांड भेदन केले जाते. यावर्षी कुष्मांड भेदनावेळी गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिसांच्या वतीने विशेष बंदोबस्त करण्यात आला आहे.
भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. उन्हाचा कडाका लक्षात घेऊन मंडपात पंखे लावण्यात आले असून, तापलेल्या फरशीमुळे भाविकांच्या पायाला चटके बसू नयेत म्हणून मॅटची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या रांगेचे नियोजन करण्यासाठी बॅरिकेडस् लावण्यात आले आहेत. भजनासाठी आणि पोलिसांसाठी स्वतंत्र स्टेज उभारण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यासह वापराच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, स्वच्छतेवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. देवस्थान समितीच्या यात्रा निवासातील स्वच्छतागृहे भाविकांसाठी खुली करण्यात येणार आहेत.
तिसऱ्या माळेला त्र्यंबोलीदेवीची वनलक्ष्मी रूपात पूजा
नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला मंगळवारी टेंबलाईदेवीची वनलक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली. प्रदीप गुरव, प्रमोद गुरव आणि सदानंद गुरव यांनी ही पूजा बांधली.