सामाजिक कार्यकर्ते आयुब पट्टेकरी यांनी थेट गळती झालेल्या पाण्याच्या खड्ड्यात उतरून अनोखे आंदोलन केले Pudhari
कोल्हापूर

Kurundwad Protest | कुरुंदवाड येथे जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या खड्ड्यात बसून अनोखे आंदोलन

गोठणपूर परिसर पाण्यासाठी तहानलेला, तर बसवेश्वर चौकात हजारो लिटर पाणी वाया; पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाविरोधात संताप

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur Kurundwad Water Pipeline Leakage

कुरुंदवाड : शहरातील बसवेश्वर चौकातील मुख्य पाणीपुरवठा व्हॉल्व्हला पुन्हा गळती लागून हजारो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते आयुब पट्टेकरी यांनी थेट गळती झालेल्या पाण्याच्या खड्ड्यात उतरून अनोखे आंदोलन केले. या वेळी पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवठा करणाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

बसवेश्वर चौकातील मुख्य पाणीपुरवठा व्हॉल्व्हला वारंवार गळती लागत असल्याने मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे. शहरातील विविध भागांतील व्हॉल्व्हमध्ये सातत्याने गळती होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पालिकेतील काही कर्मचाऱ्यांनीच दुरुस्ती साहित्याचा ठेका घेतल्याची चर्चा असून, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे दुरुस्ती केल्यानंतरही काही दिवसांत पुन्हा गळती सुरू होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे पालिकेचा खर्च वाढत असून पिण्याच्या पाण्याचीही मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होत आहे.

दरम्यान, गोठणपूर परिसरात अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे संतप्त नागरिकांचे शिष्टमंडळ पालिकेत दाखल झाले. पाणीपुरवठा सभापती अनुपस्थित असल्याने नागरिकांनी उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड आणि उदय डांगे यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. काही ठिकाणी मोटारीद्वारे अनधिकृत पाणीउपसा होत असल्याने शेवटच्या टोकावरील भागात कमी दाबाने पाणी पोहोचते आणि अनेक घरांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली.

एका बाजूला गोठणपूर परिसरातील नागरिक पाण्याच्या टंचाईने त्रस्त असताना, दुसऱ्या बाजूला बसवेश्वर चौकात हजारो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याने शहरात संताप व्यक्त होत आहे. "एकीकडे पाण्यासाठी नागरिकांची धावपळ, तर दुसरीकडे पाण्याची उधळपट्टी" अशी चर्चा शहरभर रंगली असून, यामुळे लोकप्रतिनिधींनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

आंदोलनादरम्यान आयुब पट्टेकरी म्हणाले, "पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे. तिची अशा प्रकारे होणारी नासाडी अत्यंत दुर्दैवी आहे. वारंवार गळती होणे म्हणजे दुरुस्तीच्या कामात गंभीर त्रुटी असल्याचे द्योतक आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवठा करणारे, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT