Stray dog menace Kurundwad Kolhapur
कुरुंदवाड : कुरुंदवाड शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर अखेर नगरपालिका प्रशासनाने ॲक्शन मोडमध्ये येत कारवाई सुरू केली आहे.
याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावत तातडीने मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून आतापर्यंत १६ कुत्र्यांना पकडण्यात आले आहे. ही कारवाई ‘आसरा ॲनिमल वेल्फेअर’ कंपनीच्या माध्यमातून राबवली जात आहे.
दरम्यान, गोठणपूर व गिरीश सिनेमा परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिक, बालिका तसेच जनावरांवर हल्ले चढवत धुमाकूळ घातला होता. या हल्ल्यात आनंदा किसप्पा प्रधाने (वय ६०) आणि हेमा यादव (वय ९) हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच चार रेडके आणि तीन शेळीच्या पिल्लांनाही या कुत्र्याने जखमी केले होते.
या घटनांनंतर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. त्याची दखल घेत पालिकेने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. शहरातील विविध भागांत सापळे लावून मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू असून पुढील काही दिवसांत ती अधिक तीव्र केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.