कोल्हापूर

Kurundwad Crime: विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पंढरपूरमधून अटक

शुक्रवारी (दि. ३१) सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातील संशयित शिक्षक अजित भूपाल दिवटे याला अखेर कुरुंदवाड पोलिसांनी पंढरपूर येथून ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या दिवटेच्या अटकेसाठी पोलिसांनी अत्यंत गुप्तता बाळगत कारवाई केली. शुक्रवारी (दि. ३१) सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणात आरोपी शिक्षक अजित दिवटे याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या अटकेची मागणी विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून केली जात होती. तपासातील दिरंगाईवरून पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवून सापळा रचला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानदेव सानप आणि अविनाश भोसले यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे पंढरपूर येथे कारवाई करत संशयित शिक्षक अजित दिवटे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी या कारवाईत पूर्ण गोपनीयता राखली होती.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत या प्रकरणातील पुढील तपासाला वेग दिला आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला पोलीस कोठडी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT