वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर प्रयत्न करून पहाटेपर्यंत आग आटोक्यात आणली  Pudhari
कोल्हापूर

Forest Fire Kolhapur | कुंभोज वनक्षेत्र परिसरातील वणवा आटोक्यात: वनविभागाचे रात्रभर शर्थीचे प्रयत्न

कुंभोज येथील बाबुजमाल परिसरातील वनविभागाच्या क्षेत्रात वणवा

पुढारी वृत्तसेवा

Kumbhoj Hill Fire

कुंभोज : कुंभोज येथील बाबुजमाल परिसरातील वनविभागाच्या क्षेत्रात शनिवारी सायंकाळी वणवा लागल्याची घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रात्रभर प्रयत्न करून पहाटेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले.

वणवा लागल्याची माहिती मिळताच हातकणंगलेचे वनपाल संजय कांबळे, वनरक्षक मंगेश वंजारे, वनरक्षक अरुण खामकर (तमदलगे) तसेच वनकर्मचारी लहू भंडारी, हरी जाधव, विनायक माळी आणि अक्षय कांबळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते आणि परिसरात ठिकठिकाणी आगीचे लोळ दिसत होते. परिसरात उंच कडे असल्याने आग विझवणे अत्यंत जोखमीचे ठरत होते.

तरीही जीवाची पर्वा न करता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचे काम सुरू ठेवले. कोणत्याही आधुनिक साधनसामग्रीचा अभाव असतानाही त्यांनी रात्रभर अथक प्रयत्न करत पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.

दरम्यान, आजूबाजूच्या गावांशी संपर्क साधल्यानंतर तमदलगे व दानोळी येथील चार ते पाच तरुणांनीही मदतीसाठी धाव घेतली. त्यांच्या सहकार्यामुळे आग नियंत्रणात आणणे शक्य झाले.

या वणव्यामुळे कुंभोज, दानोळी, निमशिरगाव आणि तमदलगे या गावांच्या हद्दीतील मोठ्या प्रमाणातील जंगलक्षेत्र धोक्यात आले होते. मात्र वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे संभाव्य मोठे नुकसान टळले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या धाडसी प्रयत्नांचे परिसरातील ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT