नृसिंहवाडी : कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमेच्या योगावर नृसिंहवाडी येथील दत्त मंदिराचा लक्ष लक्ष दिव्यांनी कृष्णाकाठ उजळून निघाला. या दीपोत्सवासाठी लाखो भाविकांनी दिवसभरात हजेरी लावली.
‘दीपोत्सव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा यासह राज्यभरातून भाविक मोठ्या श्रद्धेने दाखल झाले होते. पहाटेपासूनच 'श्री गुरुदेव दत्त' आणि 'दिगंबरा दिगंबरा'च्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला होता.
सायंकाळी दत्त दर्शनानंतर मंदिर परिसर तसेच घाटावर पाण्यात पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. तसेच अनेक भाविकांनी कृष्णा नदीच्या संथ प्रवाहावर सोडलेले दिवे आणि घाटावरील पणत्यांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब हे दृश्य जणू आकाशातील तारेच जमिनीवर अवतरल्याचे भासत होते.
मंदिराच्या पायऱ्यांपासून ते नदीच्या प्रवाहापर्यंत, जिथे जागा मिळेल तिथे भाविकांनी पणत्या, मेणबत्त्या आणि दिवे लावले होते. आकर्षक रांगोळ्या आणि फुलांच्या सजावटीने या सोहळ्याची शोभा अधिकच वाढवली होती. पौर्णिमेनिमित्त येथील मंदिरात पहाटे काकड आरती, पंचामृत अभिषेक सेवा संपन्न झाली. रात्री धूपआरती झाल्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीं’चा पालखी सोहळा पार पडला. आज कार्तिक स्नान समाप्ती असल्याने अनेक भाविकांनी पहाटेपासूनच कृष्णा नदीकाठावर स्नानाचा लाभ घेतला. या अलोट गर्दीचे आणि दीपोत्सवाचे नियोजन करण्यासाठी श्री दत्त देवस्थान समिती, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली होती.
दैनिक पुढारीच्या वृत्ताची दखल
नृसिंहवाडी येथे सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीसंबंधी दैनिक पुढारीने वृत्त प्रसिद्ध केले होते. याचीच दखल घेऊन पोलिस प्रशासनाने बुधवारी गर्दीच्या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवला होता. येथील औरवाड फाटा, स्वागत कमान येथे वाहतूक नियंत्रक थांबून होते. यामुळे दिवसभरात कोठेही वाहतूक कोंडी उद्भवली नाही. याबद्दल भाविकांनी दैनिक पुढारीचे आभार व्यक्त केले.